Oceans and Seas : महासागर आणि समुद्र यात काय फरक आहे? त्यांचं वर्गीकरण कसं केलं आहे?
Oceans and Seas: जगात महासागर आणि समुद्र दोन्ही आहेत. पण हे दोन गट कसे पाडले आहेत? जगात एकूण किती महासागर आणि समुद्र आहेत? सात समुद्र आणि पाच महासागरांची नावे काय आहेत?

सात समुद्रच का?
लहानपणापासून आपण 'सात समुद्र' हा शब्द ऐकत आलो आहोत. चित्रपट, गाणी आणि कथांमध्येही हा शब्द वारंवार येतो. पण खरंच जगात फक्त सात समुद्र आहेत का? चार किंवा पाच समुद्र न म्हणता सातच का? असे प्रश्न अनेकांना पडतात. खरंतर सात समुद्र हा काही अचूक भौगोलिक आकडा नाही. हा वर्षानुवर्षे वापरला जाणारा ऐतिहासिक शब्द आहे. प्राचीन ग्रीक आणि रोमन काळात एजियन समुद्र, अरबी समुद्र, भूमध्य समुद्र, काळा समुद्र, लाल समुद्र, कॅस्पियन समुद्र आणि पर्शियन आखात यांना मिळून सात समुद्र म्हटले जायचे. त्या काळात व्यापारी मार्ग आणि ज्ञात जलमार्गांच्या आधारे ही यादी बदलत असे.

पाच महासागर
सध्या पृथ्वीवर पाच मुख्य महासागर आहेत. ते म्हणजे पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, आर्क्टिक आणि दक्षिण महासागर. यापैकी पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. सर्वात खोल ठिकाण असलेली मारियाना ट्रेंच याच महासागरात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अटलांटिक महासागर दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिंदी महासागराला भारताचे नाव देण्यात आले आहे. आर्क्टिक महासागर हा पाचपैकी सर्वात लहान आहे. दक्षिण महासागर हा अंटार्क्टिका खंडाभोवती पसरलेला आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग सुमारे 71 टक्के पाण्याने व्यापलेला आहे. जगातील एकूण पाण्यापैकी सुमारे 97 टक्के पाणी समुद्राच्या रूपात आहे.
समुद्र आणि महासागर यातील फरक
समुद्र आणि महासागर यात काय फरक आहे? महासागर हे पाण्याचे खूप मोठे साठे आहेत. समुद्र हे महासागरांचाच एक भाग असतात. समुद्र हे महासागरांपेक्षा लहान आणि कमी खोल असतात. यातील काही जमिनीने आणि बेटांनी काही अंशी वेढलेले असतात. उदाहरणार्थ, अरबी समुद्र हा हिंदी महासागराचा भाग आहे. गल्फ आणि बे हे शब्दही जलक्षेत्रासाठीच वापरले जातात. जेव्हा समुद्राचे पाणी जमिनीच्या आत घुसून तीन बाजूंनी जमिनीने वेढलेले असते तेव्हा त्याला आखात म्हणतात. त्याचा मुख भाग अरुंद असल्यास गल्फ आणि रुंद असल्यास बे म्हणतात. मेक्सिकोचे आखात, पर्शियन आखात आणि बंगालचा उपसागर ही याची उदाहरणे आहेत. अशा प्रकारे समुद्र, महासागर आणि आखात हे सर्व पृथ्वीवरील पाण्याचे साठे असले तरी आकार आणि खोलीच्या आधारावर त्यांची नावे बदलतात.

