चीनमधील एका तरुण जोडप्याने १२ मीटर लांबीच्या जुन्या बसचं रूपांतर चक्क 2BHK घरात केलं आहे. चीनमधील वाढत्या महागाईला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला असून, आता ते या फिरत्या घरातून संपूर्ण देश फिरत आहेत.
सोशल मीडियावर सध्या एका भन्नाट जुगाडाची जोरदार चर्चा आहे. चीनमधील एका तरुण जोडप्याने १२ मीटर लांबीच्या एका मोठ्या बसला चक्क आलिशान 2BHK घरात बदललं आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
या फिरत्या घराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात बसच्या आतलं मॉडर्न इंटिरिअर आणि जागेचा केलेला अचूक वापर पाहायला मिळतो. या जोडप्याने बसमधल्या सगळ्या सीट, डॅशबोर्ड आणि जुनी वायरिंग काढून टाकली. त्या जागी त्यांनी एक सुंदर घर तयार केलं असून, आता ते याच घरातून संपूर्ण देशाची सफर करत आहेत.
गेल्या काही वर्षांत चीनमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे तिथले तरुण आता साधी जीवनशैली आणि घरांसाठी असे भन्नाट पर्याय निवडताना दिसत आहेत.
चिनी जोडप्याने बसचं घर कसं बनवलं?
हे जोडपं शांघायपासून सुमारे ४०० किलोमीटर उत्तरेला असलेल्या जिआंग्सू प्रांतातील लियानयुंगांग (Lianyungang) शहरात राहतं. त्यांनी एक जुनी १२ मीटर लांबीची कमर्शियल बस विकत घेतली. त्यानंतर सलग काही महिने मेहनत घेऊन त्यांनी या बसचं रूपच पालटून टाकलं.
त्यांनी ही बस अवघ्या ३०,००० युआनमध्ये (सुमारे ४,२०० डॉलर्स) विकत घेतली होती. त्यामुळे उरलेले पैसे त्यांनी बसच्या इंटिरिअरवर खर्च केले. त्यांनी सर्वात आधी बसमध्ये इन्सुलेशन, फ्लोअरिंग, इलेक्ट्रिक सिस्टीम आणि प्लंबिंगचं काम करून घेतलं. त्यानंतर उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करत बेडरूम, किचन आणि एक मस्त लिव्हिंग एरिया तयार केला.
या 2BHK घरात एका मोठ्या बेडसह आणि आकर्षक लायटिंगसह एक मुख्य बेडरूम आहे. तर दुसरी खोली गेस्ट रूम, वर्कस्पेस किंवा स्टोअर रूम म्हणून वापरली जाते. बसच्या मागच्या बाजूला असलेल्या बेडरूममधून त्यांना प्रायव्हसी तर मिळतेच, शिवाय बसच्या मूळ काळ्या काचांमधून बाहेरचा निसर्गरम्य नजाराही पाहता येतो.
बेडरूम व्यतिरिक्त या फिरत्या घरात एक लिव्हिंग रूम आहे, जिथे मॉड्युलर सिटिंगची व्यवस्था आहे. गरज नसताना फोल्ड करता येईल अशी डायनिंग स्पेस, इंडक्शन कुकटॉप असलेलं किचन, फ्रीज, स्टोरेज कॅबिनेट आणि एक बाथरूमही यात आहे. थोडक्यात सांगायचं तर, लांबच्या प्रवासासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा या घरात आहेत.
पाश्चात्य देशांच्या तुलनेत चीनमध्ये अशा प्रकारे बसचं घरात रूपांतर करण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. पण जे लोक एकाच शहरात राहून आयुष्यभर घराचा ईएमआय (EMI) भरण्यापेक्षा फिरतीला प्राधान्य देतात, ते अशा पर्यायांचा विचार करतात.
चिनी तरुण असे भन्नाट पर्याय का निवडत आहेत?
चीनमधील शहरांमध्ये घरांच्या वाढत्या किमतींमुळे तरुणांवर मोठा आर्थिक ताण येत आहे. शांघाय, चेंगदू, राजधानी बीजिंग आणि ग्वांगझू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे अनेक तरुण जोडपी आता घर घेण्याच्या पारंपारिक विचारांना फाटा देत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, चीनमधील शहरांमध्ये घर घेणं खूपच महाग झालं आहे. त्यासाठी अनेक दशके कर्ज फेडावं लागतं, ज्यामुळे मोठा आर्थिक ताण येतो. कामाचे वाढलेले तास, शहरातील जीवघेणी स्पर्धा आणि घरांच्या कर्जाचा बोजा यामुळे तरुणांना आता स्वतःचं घर घेणं फारसं आकर्षक वाटत नाही.
जुन्या गाड्यांचं अशा प्रकारे फिरत्या घरात रूपांतर केल्यामुळे या जोडप्यांचा मोठा खर्च वाचतो. मोठ्या शहरांमध्ये घर घेण्याच्या तुलनेत हा पर्याय खूपच स्वस्त आणि सोयीचा ठरतो.
शहरात घर घेण्यासाठी जेवढं डिपॉझिट भरावं लागतं, त्यापेक्षा खूप कमी खर्चात अशी फिरती घरं तयार होतात. यामुळे दर महिन्याला भरावं लागणारं भाडं आणि कर्जाचा हप्ता या दोन्ही गोष्टींपासून तरुणांची सुटका होते. शिवाय, एकाच जागी अडकून न राहता, साधेपणाने जगण्याचं आणि मनसोक्त फिरण्याचं स्वातंत्र्यही त्यांना मिळतं.






