सार

बीपीएल कंपनीचे संस्थापक टीपीजी नंबियार यांचे निधन झाले. त्यांनी भारतात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात क्रांती घडवून आणली, टीव्हीपासून मोबाईलपर्यंत अनेक उत्पादने घराघरात पोहोचवली.

देशातील प्रमुख उद्योजकांपैकी एक म्हणजे टीपीजी नंबियार. ते भारतातील घराघरात पोहोचलेल्या बीपीएल कंपनीचे संस्थापक होते. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईलपासून ते विविध उत्पादनांपर्यंत ते घराघरात पोहोचले होते. लाखो लोकांना रोजगार देऊन, भारतीय ग्राहकांच्या मनात घर करणाऱ्या या उद्योजकाने शुक्रवारी बेंगळुरू येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कामगिरीची थोडक्यात माहिती येथे आहे.

संरक्षण उत्पादने बीपीएलची पहिली उत्पादने: टी.पी. गोपालन नंबियार हे ब्रिटिश फिजिकल लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड (बीपीएल) चे संस्थापक होते. नंबियार यांचा प्रवास इंग्लंडमध्ये सुरू झाला, जिथे त्यांनी ब्रिटिश फिजिकल लॅबोरेटरीसोबत एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशनमध्ये कौशल्य मिळवले. भारतात परतल्यानंतर, त्यांनी स्वदेशी इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे ध्येय बाळगले, १९६३ मध्ये केरळच्या पालाक्कड येथे बीपीएलचा पहिला कारखाना स्थापन केला आणि देशभरातील लाखो लोकांचा विश्वास असलेला ब्रँड निर्माण केला. सुरुवातीला, ते लहान संरक्षण उपकरणे तयार करत होते. संरक्षण उपकरणे ही कंपनीची पहिली उत्पादने होती.

टीव्ही क्षेत्रात बीपीएलची क्रांती: १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला म्हणजेच १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर कलर टीव्ही आणि व्हिडिओ कॅसेटची वाढती मागणी गोपालन नंबियार यांनी लक्षात घेतली. तेव्हापासून संरक्षण उपकरणांबरोबरच ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनाकडे बीपीएलचा विस्तार झाला आणि बेंगळुरूच्या चर्च स्ट्रीटवर बीपीएल इलेक्ट्रॉनिक्सचे मुख्य कार्यालय स्थापन झाले. १९९० पर्यंत, बीपीएलने भारतीय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात एका दिग्गज कंपनी म्हणून स्वतःला स्थापित केले. तसेच, दूरसंचार, सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक घटकांपर्यंत विस्तार केला.

कोणाच्याही घरी गेलात तरी त्या घरात बीपीएलचा टीव्ही असणे सामान्य होते. बीपीएल एवढ्या प्रमाणात ९० च्या दशकात घराघरात पोहोचला होता. आर्थिक उदारीकरणामुळे सॅमसंग आणि एलजीसारख्या कंपन्या भारतात आल्या तरी बीपीएलचे स्वतःचे ग्राहक होते. त्या काळात टीव्ही क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या बीपीएलने देशातील टॉप १० प्रमुख कंपन्यांमध्ये स्थान मिळवले होते आणि टीव्ही क्षेत्रात १५% बाजारपेठ हिस्सा होता. ९० च्या दशकात कंपनीचे उत्पन्न दरवर्षी सुमारे ४३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. टीव्हीची परदेशात निर्यात करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून त्याची ख्याती होती.

देशातील पहिली मोबाईल कंपनी बीपीएल: ९० च्या दशकानंतर आर्थिक उदारीकरणाचा काळ सुरू झाला आणि परदेशी कंपन्या भारतात आल्या. त्यामुळे या उदारीकरणाच्या काळात परदेशी कंपन्यांकडून वाढती स्पर्धा लक्षात घेऊन, बीपीएलने बदलत्या काळानुसार कंपनीचे लक्ष दूरसंचार आणि मोबाईल तंत्रज्ञानाकडे वळवले. नंबियार यांचे जावई राजीव चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली बीपीएल मोबाईल फोन क्षेत्रात एक वेगळी क्रांती घडवण्यास कारणीभूत ठरले. १९९४ मध्ये बीपीएलने मोबाईल ऑपरेशन सुरू केले आणि देशातील पहिली मोबाईल नेटवर्क कंपनी बनली. लाखो ग्राहक असलेल्या या कंपनीने २००९ मध्ये लूप मोबाईल असे नाव बदलले.

अजूनही बाजारात बीपीएलची चमक: नंबियार यांनी स्थापन केलेल्या बीपीएलने टीव्ही, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवल्यानंतर आता वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांकडे लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय सध्या, एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, एसी, मिक्सर ग्राइंडर, वॉशिंग मशीन, वायरलेस हेडसेट, बीपीएल ब्लूटूथ नेकबँड, पंखे, होम थिएटर इत्यादी उत्पादने विकली जात आहेत. ते दूरसंचार, वैद्यकीय उत्पादने आणि प्रिंटेड सर्किट बोर्ड (पीसीबी) उत्पादन क्षेत्रात देखील आहे. टीपीजी नंबियार यांचे पुत्र अजित नंबियार सध्या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. बीपीएल ही एनएसई आणि बीएसईवर व्यवहार करणारी सूचीबद्ध कंपनी आहे. बाजार मूल्य ५३० कोटी रुपये आहे.