The Real Reason Why LPG Cylinders Weigh Exactly 14.2 KG: आपल्या घरातल्या गॅस सिलेंडरचं वजन नेहमी 14.2 किलोच का असतं, यामागे एक खास लॉजिक आहे. एक सामान्य माणूस किती वजन उचलू शकतो, एका मध्यमवर्गीय कुटुंबाला महिन्याला किती गॅस लागतो आणि सप्लाय चेनचं गणित, या सगळ्याचा विचार करून हे वजन ठरवण्यात आलं आहे.

The Real Reason Why LPG Cylinders Weigh Exactly 14.2 KG: बंगळुरू (19 मार्च): सध्या गॅसच्या तुटवड्यामुळे एजन्सींसमोर सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागत आहेत. अशावेळी आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की, गॅस सिलेंडरवर '14.2 KG' असंच का लिहिलेलं असतं? सरळ 14 किंवा 15 किलो का नाही? या विचित्र आकड्यामागे एक जबरदस्त लॉजिक आहे, जे ऐकून तुम्हीही चकित व्हाल.

14.2 किलो वजन बंधनकारक आहे का?

खरं सांगायचं तर, सिलेंडरचं वजन 14.2 किलोच असावं, असा कोणताही कडक नियम नाही. हा निर्णय कधीही बदलला जाऊ शकतो. पण, हा आकडा ठरवण्यामागे एक ठोस विचार केलेला आहे. सामान्य माणसाला सिलेंडर वापरणं, उचलून नेणं सोपं जावं आणि ते ग्राहकांच्या खिशाला परवडावं, हा यामागचा मुख्य हेतू आहे.

याचं रहस्य इतिहासात दडलंय!

भारतात घरगुती LPG सिलेंडरचा वापर 1950 च्या दशकात सुरू झाला. त्यावेळी 'बर्मा शेल' (Burmah Shell) नावाची एक परदेशी कंपनी स्वयंपाकाचा गॅस पुरवत होती. याच कंपनीने पहिल्यांदा सिलेंडरचा आकार आणि वजन निश्चित केलं होतं. पुढे याच कंपनीचं नाव बदलून आजची 'भारत पेट्रोलियम' (BPCL) कंपनी झाली.

ही आहेत तीन मुख्य कारणं

बर्मा शेल कंपनीने सिलेंडरचं वजन ठरवताना लोकांच्या सोयीचा सर्वात जास्त विचार केला. 14.2 किलो गॅस आणि रिकाम्या टाकीचं वजन मिळून सिलेंडरचं एकूण वजन सुमारे 29 ते 30 किलो होतं. त्यावेळच्या सर्व्हेनुसार, एक सामान्य माणूस सहजपणे उचलू शकेल असं हे जास्तीत जास्त वजन होतं. जर हे वजन 30 किलोपेक्षा जास्त असतं, तर ते उचलून घरात नेणं किंवा ओढणं खूप अवघड झालं असतं.

एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला महिन्याला किती गॅस लागतो, याचा हिशोब तज्ज्ञांनी आणि संशोधनातून काढला होता. 14.2 किलो गॅस साधारणपणे 30 ते 45 दिवस (म्हणजे एक ते दीड महिना) पुरतो, असं दिसून आलं. एकदा सिलेंडर आणला की तो किमान महिनाभर तरी चालावा, या उद्देशाने हे प्रमाण ठरवण्यात आलं.

एका कुटुंबाला एक सिलेंडर महिनाभर पुरतो, हे कळल्यावर गॅस एजन्सींना पुरवठ्याचं गणित मांडणं सोपं झालं. नवीन सिलेंडर बुकिंग आणि डिलिव्हरीची प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने चालवण्यासाठी हे 'मॉडेल' खूप यशस्वी ठरलं. गेल्या अनेक दशकांपासून हे 14.2 किलोचं मॉडेल भारतात यशस्वीपणे सुरू आहे.