तुमचा LPG गॅस सिलेंडर लवकर संपतो का? गॅस वाचवण्यासाठी या ५ सोप्या किचन टिप्स जाणून घ्या. योग्य भांड्याचा वापर, प्रेशर कुकर, झाकण ठेवून स्वयंपाक आणि बर्नरची स्वच्छता यांसारख्या उपायांनी तुम्ही गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करू शकता.

इराण-इस्रायल युद्धामुळे फक्त सोनं-चांदीच नाही, तर डिझेल, पेट्रोल आणि घरगुती गॅसचे दरही वेगाने वाढत आहेत. भारतात LPG गॅसच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे स्वयंपाकघरातील गॅसचा योग्य वापर करणं खूप गरजेचं झालं आहे. अनेक घरांमध्ये गॅस सिलेंडर लवकर संपल्याची तक्रार असते, पण अनेकदा यामागे आपल्याच काही छोट्या-छोट्या सवयी कारणीभूत असतात. स्वयंपाक करताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. योग्य भांडं, योग्य आच आणि योग्य पद्धत वापरून तुम्ही तुमचा सिलेंडर जास्त काळ चालवू शकता. चला, LPG गॅस वाचवण्याच्या ५ सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया, ज्या प्रत्येक गृहिणीला माहित असायलाच हव्यात.

योग्य आकाराची भांडी वापरा

अनेकदा आपण छोट्या बर्नरवर मोठं भांडं किंवा मोठ्या बर्नरवर छोटं भांडं ठेवतो, यामुळे गॅस वाया जातो. भांड्याचा आकार बर्नरच्या आकाराएवढाच असेल याची काळजी घ्या. तसेच, जाड बुडाची भांडी वापरल्यास अन्न लवकर शिजतं आणि गॅसची बचत होते.

स्वयंपाक करताना भांड्यावर झाकण ठेवा

जर तुम्ही डाळ, भाजी किंवा भात शिजवताना भांड्यावर झाकण ठेवलं, तर वाफ आतच राहते आणि जेवण लवकर शिजतं. यामुळे गॅस कमी लागतो आणि जेवणाची चवही छान लागते.

प्रेशर कुकरचा जास्त वापर करा

प्रेशर कुकरमध्ये वाफेचा दाब जास्त असल्यामुळे अन्न लवकर शिजतं. डाळ, भात, भाज्या आणि इतर अनेक पदार्थ कुकरमध्ये बनवल्यास ३०-४०% पर्यंत गॅसची बचत होऊ शकते.

स्वयंपाकाची पूर्वतयारी करून ठेवा

स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी भाज्या चिरून आणि बाकीचं साहित्य तयार ठेवा. गॅस चालू केल्यावर मधेच तयारी करत बसल्यास विनाकारण गॅस जळत राहतो. आधी तयारी केल्याने गॅस आणि वेळ दोन्ही वाचतात.

गॅस बर्नर आणि पाईपची नियमित स्वच्छता करा

गॅस बर्नरच्या छिद्रांमध्ये घाण साचल्यामुळे ज्योत (फ्लेम) नीट येत नाही आणि गॅस जास्त खर्च होतो. त्यामुळे वेळोवेळी बर्नर स्वच्छ करा आणि पाईपचीही तपासणी करत राहा. स्वच्छ बर्नरवर अन्न लवकर शिजतं आणि गॅस कमी वापरला जातो.