सार

बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे गेल्या ४८ तासांत ७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व घटना तेलंगणा राज्यातील आहे. इंटरमिजिएट परीक्षेत नापास झाली असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. 

नवी दिल्ली : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे गेल्या ४८ तासांत ७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व घटना तेलंगणा राज्यातील असून मिळालेल्या माहितीनुसार,आत्महत्या केलेली सर्व मुले तेलंगणा बोर्डाच्या इंटरमिजिएट परीक्षेत नापास झाली असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 24 एप्रिलला मंडळाने प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर केला होता .

महबूबाबादच्या पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेत नापास झाल्यामुळे दोन मुलींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. पोलिस उपायुक्त (पूर्व विभाग) आर गिरीधर यांनी सांगितले की, पहिल्या वर्षातील आणखी एका विद्यार्थ्याने परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या केली आहे. जडचेलरा येथील रेल्वे ट्रॅकजवळ नल्लाकुंटा भागातील आणखी एक मुलगा मृतावस्थेत आढळून आला. परीक्षेतील खराब कामगिरी हे त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचा पोलिसांचा संशय आहे.या विद्यार्थ्याच्या व्यतिरिक्त राज्यातील इतर भागातून 16 ते 17 वर्षांदरम्यान वय असलेल्या सहा विद्यार्थीनींनी आत्महत्या केली आहे. काहींनी गळफास घेतला, काहींनी गावातील विहिरीत उडी घेतली तर काहींनी तलावात उडी घेऊन जीवन संपविल.

अशाच आणखी एका प्रकरणाबाबत, मंचेरियल जिल्ह्याच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना असे अहवाल मिळाले आहेत की तीन इंटरमिजिएट प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत नापास झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्या आहेत.

तेलंगणात सर्वाधिक जेईई मध्ये यश मिळवलेले विद्यार्थी :

यावर्षी तेलंगणातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी जेईई मुख्य परीक्षेत यश मिळवले आहे. असे असताना देखील आत्महत्यांच्या अशा घटना समोर येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच संपूर्ण देशातील सर्वाधिक 100 टक्के गुण मिळवण्यामध्ये देखील तेलंगणा राज्य प्रथम क्रमांकावर आहे.