परीक्षेदरम्यान मस्करी केल्याबद्दल मेहसाणाच्या उत्कर्ष विद्यालयातील इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली. यात तो जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मुलांची सुरक्षितता लक्षात ठेवून शाळांसाठी नियमावली करण्यात आली आहे. त्यात विद्यार्थ्यांना शिक्षा करताना शारीरिक इजा न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही शिक्षक अथवा शिक्षिकेने विद्यार्थी / विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याच्या घटना घडतच आहेत. काही घटनांमध्ये शिक्षक वा शिक्षिकेची एवढी अमानुषता असते की, संबंधित विद्यार्थी वा विद्यार्थिनीच्या जीविताला धोका निर्माण होतो. अशा घटनांमुळे पालकांच्या मनात आपल्या पाल्याबाबत चिंता निर्माण होते.

गुजरातच्या मेहसाणामधील मोटीदाऊ परिसरातील उत्कर्ष विद्यालयात अशीच एक गंभीर घटना घडली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शाळांमधील शारीरिक शिक्षेच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इयत्ता 8वीच्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाने काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली. या घटनेनंतर, मुलाला उपचारासाठी मेहसाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, असे स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार समजते.

विद्यार्थ्याच्या पालकांनी दिलेल्या जबाबानुसार शिक्षकाविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी झालेल्या एका परीक्षेनंतर घडली. रेयांश नावाचा 14 वर्षांचा मुलगा उत्कर्ष विद्यालयात इयत्ता 8वी मध्ये शिकतो. तो मेहसाणा शहरातील यशोदानगरमधील एअरोड्रम रोडवर आपल्या कुटुंबासोबत राहतो.

परीक्षा संपल्यानंतर रेयांश आणि त्याचे मित्र वर्गात आपापसात बोलत होते आणि मस्करी करत होते. असा आरोप आहे की, शिक्षक नील पटेल यांनी त्यांचे बोलणे ऐकले.

शनिवारी, शिक्षकाने रेयांश आणि इतर तीन विद्यार्थ्यांना वर्गात उभे राहण्यास सांगितले, असे दिव्य भास्करच्या वृत्तात म्हटले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना काठीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत रेयांशच्या डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला.

विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केले

डोक्याला, हाताला आणि पायाला झालेल्या दुखापतींमुळे रेयांशला उपचारासाठी मेहसाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या पालकांनी स्थानिक तालुका पोलीस ठाण्यात जाऊन शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.

शिक्षक नील पटेल यांनी आपल्या कृतीचा बचाव केला आहे. त्यांनी दावा केला की, परीक्षेदरम्यान काही विद्यार्थी कॉपी करत होते. त्यांच्या मते, इशारा देऊनही विद्यार्थी थांबले नाहीत. दुसऱ्या एका शिक्षकाने त्यांना याबद्दल माहिती दिली आणि ते विभागप्रमुख असल्याने त्यांनी कारवाई केली.

“मी चार-पाच मुलांना काठीने मारले. त्यांनी नीट वागावे आणि परीक्षा गांभीर्याने द्यावी, यासाठी त्यांना शिस्त लावण्याचा माझा हेतू होता,” असे शिक्षक म्हणाले. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी माझ्या मुलांसारखे आहेत, माझे शत्रू नाहीत.

त्यांनी असाही दावा केला की, इतर कोणत्याही पालकांनी आक्षेप घेतला नाही आणि एका पालकाने तर फोनवर सांगितले की, विद्यार्थ्यांना अशा प्रकारे सुधारणे मान्य आहे.

उत्कर्ष विद्यालयाचे प्राचार्य गोविंदभाई पटेल म्हणाले की, पालकांचा फोन आल्यानंतर त्यांनी शिक्षकाशी चर्चा केली. ते म्हणाले की, शिक्षकाला त्याच्या कृत्याबद्दल खडसावण्यात आले.

शाळा व्यवस्थापनाने अद्याप शिक्षकावर कोणती अंतर्गत कारवाई केली आहे की नाही, याबाबत तपशील दिलेला नाही.

जिल्हा शिक्षण अधिकारी बी.एन. पटेल यांनी सांगितले की, शिक्षण नियमांनुसार मुलांना शारीरिक शिक्षा देण्यास सक्त मनाई आहे. ते म्हणाले की, विभाग अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतो.

“जर कोणत्याही विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षा दिल्याचे आढळले, तर शाळेत एक पथक पाठवून चौकशी केली जाईल. जबाबदार असलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुचवली जाईल,” असे ते म्हणाले.

नेमके काय घडले हे शोधण्यासाठी चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपासाचा भाग म्हणून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळा कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जातील.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील कारवाई तपासाच्या निष्कर्षांवर अवलंबून असेल.