उत्तर प्रदेशच्या महोबा येथील एका सरकारी रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दोन सांड घुसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नातेवाईकांनी एका सांडाला बाहेर काढले, तर दुसरा आतच फिरत होता. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात बुधवारी संध्याकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. आपत्कालीन वॉर्डमध्ये अचानक दोन सांड घुसले आणि रुग्णांच्या आजूबाजूला फिरू लागले. यामुळे तिथे उपचार घेत असलेले रुग्ण चांगलेच घाबरले. रुग्णालयाच्या आत फिरणाऱ्या या सांडांचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या घटनेमुळे रुग्णांची सुरक्षा आणि रुग्णालयाच्या व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सांड रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आले आणि थेट आपत्कालीन वॉर्डमध्ये पोहोचले. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या या वॉर्डमध्ये जनावरे फिरताना पाहून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक चक्रावून गेले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी हा व्हायरल व्हिडिओ शेअर करत उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांनी कशीबशी एका सांडाला बाहेर काढण्यात यश मिळवले, पण दुसरा सांड वॉर्डमध्येच फिरत राहिला. या प्रकारामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ उडाली.
सांड वॉर्डमध्ये फिरू लागल्याने रुग्णांची पळापळ
आपत्कालीन वॉर्डमध्ये जनावरे घुसल्याने एकच गोंधळ उडाला. सांडांपासून बचाव करण्यासाठी नातेवाईक प्रयत्न करत होते, तर काही रुग्ण घाबरून थेट बेडवरून खाली उतरले.
आधीच आजारी असलेले आणि उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना या मोकाट जनावरांमुळे आणखीच मनस्ताप सहन करावा लागला. अखेर नातेवाईकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर दुसऱ्या सांडालाही रुग्णालयाबाहेर हाकलून लावले.
सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
दोन मोकाट सांड रुग्णालयात घुसून थेट आपत्कालीन वॉर्डपर्यंत कसे पोहोचले, त्यांना कोणीही कसे अडवले नाही, असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत. तसेच, रुग्णांसाठी अतिसंवेदनशील असलेल्या या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था असण्याची गरजही या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.







