केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींच्या 'व्होट चोरी'च्या आरोपांवर जोरदार टीका केली आहे. घुसखोरांची व्होटबँक वाचवण्यासाठीच काँग्रेस असे आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, २०३० पर्यंत काँग्रेसला जिंकण्याची कोणतीही संधी नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

विरोधी पक्षनेते सध्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. सणांचे दिवस संपले असून विरोधकांनी आता पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. इतर विरोधी पक्षांचे नेतेही त्यांच्या रडारवर आहेत.

अमित शाहांच्या निशाण्यावर राहुल गांधी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी विरोधकांवर सडकून टीका केली. ते स्पष्ट म्हणाले की, काँग्रेस त्यांच्या 'नकारात्मक राजकारणा'मुळे २०३० पर्यंत कोणतीही निवडणूक जिंकू शकणार नाही. राहुल गांधींच्या 'व्होट चोरी'च्या आरोपांवर बोलताना शाह म्हणाले की, घुसखोरांची व्होटबँक सुरक्षित ठेवण्यासाठीच काँग्रेस या गोष्टी बोलत आहे. यासोबतच त्यांनी 'आप'चे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनाही इशारा दिला. पंजाबमधून त्यांचा पक्ष पूर्णपणे पुसला जाईल, असे ते म्हणाले.

केजरीवालांवरही साधला निशाणा

अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना शाह पुढे म्हणाले की, पंजाबमधील जनता आम आदमी पार्टीच्या सरकारला सत्तेतून बेदखल करून त्यांना 'सडेतोड उत्तर' देईल.

देशाच्या राजधानीत एका जाहीर सभेत बोलताना गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या निपक्षपातीपणावर काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न फेटाळून लावले. निवडणुकीत हरल्यावर देशातील लोकशाही संस्थांवर खापर फोडण्याची काँग्रेसची जुनी सवय आहे, असा टोला त्यांनी लगावला.

घुसखोरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवर हल्लाबोल

अमित शाह म्हणाले, "मला राहुल गांधींना सांगायचे आहे की, व्होट चोरीचे आरोप करून तुम्ही खरंतर घुसखोरांची मते वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. अनेक दशकांपासून काँग्रेस अनेक राज्यांमध्ये सत्तेत येऊ शकलेली नाही. आणि हा ट्रेंड पंतप्रधान मोदी सत्तेत येण्याच्या खूप आधीपासून सुरू झाला आहे."

'३० वर्षांतही काँग्रेस सत्तेत येणार नाही'- अमित शाह

काँग्रेसच्या राजकीय भविष्यावर भाष्य करताना शाह पुढे म्हणाले, "तुम्ही ज्या प्रकारे नकारात्मक राजकारण करत आहात, ते पाहता २०३० पर्यंत तुम्हाला जिंकण्याची कोणतीही आशा नाही. जिथे तुम्ही जिंकता, तिथे निवडणूक आयोग खूप चांगला असतो. आणि हरलात की आयोग वाईट होतो! जर तुम्ही माझे ऐकत असाल, तर लक्षात ठेवा पुढची ३० वर्षे तुम्हाला कोणतीही संधी नाही."

यानंतर शाहांनी 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर तोफ डागली. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना ते म्हणाले की, केजरीवाल यांनी फक्त धरणे आणि आंदोलनांचे राजकारण केले, दिल्लीच्या सामान्य नागरी सुविधांकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही.

गृहमंत्री म्हणाले, "मला केजरीवालांना सांगायचे आहे की, पंजाबमधील जनता 'आप' सरकारला मुळासकट उपटून फेकेल आणि तुम्हाला योग्य उत्तर देईल. तुम्ही फक्त आंदोलन आणि निदर्शनांचे राजकारण केले. दिल्लीतील कचऱ्याचे डोंगर साफ करण्यासाठी तुम्ही काहीही केले नाही."

राजधानीतील कचरा साफ करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराची माहिती देताना शाह म्हणाले, "आम्ही यावर रात्रंदिवस काम करत आहोत. अगदी कमी वेळात हे कचऱ्याचे ढिगारे सुंदर सार्वजनिक बागांमध्ये बदलले जातील."

अमित शाह यांनी यमुना नदी स्वच्छ आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी ८,९४१ कोटी रुपये खर्चाच्या दिल्ली जल बोर्डाच्या (DJB) ४३ प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले.

शाह यांनी जोर देऊन सांगितले की, हे नवीन उपक्रम यमुना नदीच्या सर्वांगीण स्वच्छतेचा कणा म्हणून काम करतील. तसेच शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडवतील.

ते म्हणाले, "यमुना नदी स्वच्छ करण्याच्या उद्देशाने ९,००० कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी आज मी द्वारका येथे तुमच्यामध्ये आलो आहे. हे प्रकल्प यमुना स्वच्छतेचा मुख्य आधार आहेत... दिल्लीत सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच, पहिल्याच महिन्यात आमचे पंतप्रधान मोदी यांनी एक मोठी बैठक बोलावली. तिथे त्यांनी दिल्ली सरकार आणि गृह मंत्रालयासमोर यमुना स्वच्छतेबाबतची त्यांची रूपरेषा मांडली... इतक्या कमी वेळात आम्ही या उद्दिष्टाचे ४० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण केले आहे. रेखा गुप्ता आणि प्रवेश वर्मा यांच्या प्रयत्नांमुळे आज ९,००० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहे. यामध्ये सांडपाणी प्रक्रिया आणि पिण्याच्या पाण्याशी संबंधित अनेक उपक्रमांचा समावेश आहे."