flight pass: 'मी आईला सांगितलं होतं की मुंबईचा प्रवास बिझनेस क्लासने होणार आहे. पण फर्स्ट क्लासचं तिकीट अपग्रेड केल्याचं मी तिच्यापासून लपवून ठेवलं होतं.'

मुंबई: आई आपल्या मुलांसाठी आयुष्यभर खस्ता खाते. पण मुलं जेव्हा आईसाठी काहीतरी खास करतात, तेव्हा तो क्षण खूप भावुक असतो. अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय तरुणाने आपल्या आईला असंच एक भन्नाट सरप्राईज दिलंय. सध्या सोशल मीडियावर या माय-लेकाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. अतुल नावाच्या या तरुणाने सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर आईला चक्क एमिरेट्स (Emirates) फ्लाईटचं फर्स्ट क्लास तिकीट देऊन सुखद धक्का दिला. आई सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येत होती.

अतुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (@atulbranade) हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत आई साडी नेसून एमिरेट्सच्या चेक-इन काउंटरसमोर बोर्डिंग पास आणि पासपोर्ट हातात घेऊन उभी असलेली दिसते. सुरुवातीला आईला वाटलं की ती नेहमीप्रमाणे बिझनेस क्लासने प्रवास करणार आहे. पण अतुलने तिला मराठीत बोर्डिंग पास नीट वाचायला सांगितला. जेव्हा त्याने तिकिटावर छापलेलं 'FIRST' हे अक्षर दाखवलं, तेव्हा आईला समजलं की तिचं तिकीट फर्स्ट क्लासमध्ये अपग्रेड झालंय.

सुरुवातीला आईला काहीच समजलं नाही. पण सत्य समजल्यावर आश्चर्याने तिने कपाळावर हात मारून घेतला. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हसू पाहण्यासारखं होतं. या सरप्राईजमागचं कारण सांगताना अतुलने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्टही लिहिली आहे, जी लोकांची मनं जिंकत आहे.

View post on Instagram
 

अतुलने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "मी आईला सांगितलं होतं की मुंबईचा प्रवास बिझनेस क्लासने होणार आहे. फर्स्ट क्लासचं तिकीट अपग्रेड केल्याचं मी तिच्यापासून लपवून ठेवलं. आयुष्यभर आईने आम्हाला नेहमीच बेस्ट सीट, जेवणातला मोठा वाटा आणि सोप्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. तिच्या या त्यागाची परतफेड म्हणून मी एवढं तर नक्कीच करू शकतो." माय-लेकाच्या या सुंदर नात्याचा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला असून नेटकरी त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.