अंबानींच्या गणेशोत्सव सोहळ्यात कतरिना कैफ दिसली होती. तिचं वाढलेलं वजन पाहून सोशल मीडियावर काहींनी तिला बॉडी शेमिंग केलं. यावर अभिनेत्री रम्याने संताप व्यक्त केला आहे. महिलांच्या शरीरात होणारे बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, असं म्हणत तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
बऱ्याच लोकांची अपेक्षा असते की अभिनेत्रीने सडपातळ आणि गोरीपानच असावं. अनेक अभिनेत्रींना याच कारणामुळे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो. आई झाल्यावर एखाद्या महिलेचं वजन वाढणं अगदी स्वाभाविक आहे. काही जणी कालांतराने योग, ध्यान आणि डाएट करून वजन कमी करतात. पण हे प्रत्येकीलाच जमेल असं नसतं. काही लोकांना एखाद्या महिलेच्या, विशेषतः सेलिब्रिटींच्या शरीरावर टीका करून विकृत आनंद मिळतो. अभिनेत्री कतरिना कैफसोबत आता असाच काहीसा प्रकार घडला आहे.
मुकेश अंबानी यांच्या घरी नुकतंच गणेशोत्सव साजरा झाला. कतरिना कैफ तिचा नवरा विकी कौशलसोबत या सोहळ्याला आली होती. कतरिनाने नोव्हेंबर २०२५ मध्ये विहान या मुलाला जन्म दिला. तिचं वजन त्यानंतर साहजिकच वाढलं आहे. तिच्या चेहऱ्यातही बदल झाला आहे. काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी हे पाहून सोशल मीडियावर तिचे 'जुने आणि आताचे' फोटो शेअर करत घाणेरड्या कमेंट्स करायला सुरुवात केली. अशा लोकांमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो, जे दुसऱ्यांवर टीका करून आणि बॉडी शेमिंग करून आपली घाणेरडी मानसिकता दाखवतात.
रम्याचा संताप
अनेक दिग्गजांनी आधीच कतरिना कैफला ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. अभिनेत्री आणि माजी खासदार रम्यानेही आता या टीकाकारांची चांगलीच शाळा घेतली आहे. काही लोकांनी कतरिनाचे फोटो शेअर करत तिची 'प्राईम स्टेज' (सर्वोत्तम काळ) आणि 'एन्ड स्टेज' (शेवटचा काळ) अशी तुलना केली होती. अभिनेत्री रम्याने यावर तिच्या एक्स (X) अकाऊंटवरून संताप व्यक्त केला. ती म्हणाली की, महिलेचा सर्वोत्तम काळ ठरवणं म्हणजे तिचे दिवस भरलेत असं दाखवण्यासारखं आहे. सर्वोत्तम काळ म्हणजे फक्त मॅगझिनच्या कव्हरवर मॉडेलसारखं दिसणं, हे कोणी ठरवलं? असा सवाल तिने विचारला आहे.
वेगवेगळ्या टप्प्यांवर शरीरात होणारे बदल
महिलेच्या शरीरात गरोदरपण, मेनोपॉजच्या आधीचा काळ आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदल होत असतात. हा काही शेवट नाही, तर ती जगण्याची एक पद्धत आहे. 'सर्वोत्तम काळ' म्हणजे फक्त बारीक कंबर असणं नव्हे; तर ताकद, शहाणपण, काम, आनंद आणि तिने जे काही कमावलंय, ते सगळं यात येतं. कतरिना सध्या तिच्या सर्वोत्तम काळात आहे. प्रत्येक महिला तिच्या जन्मापासून ते आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वोत्तम काळातच असते, असं रम्या म्हणाली.
पुढे ती म्हणाली, "जे लोक 'तिचा बँक बॅलन्स बघा' असं म्हणतात, त्यांना मला विचारायचंय: मग कमी पैसे असलेल्या महिलेला तिच्या शरीरावरून अपमानित करणं योग्य आहे का? किंवा 'तिला बाळ झालंय, त्यामुळे ते वजन ठीक आहे' असं म्हणणाऱ्यांना वाटतं का की, बाळ नसतं तर ते वजन चुकीचं ठरलं असतं? हे कसले फालतू युक्तिवाद आहेत?" असा संताप तिने व्यक्त केला.
एखाद्या महिलेच्या शरीरावरून तिला कमी लेखू नये, हे सांगण्यासाठी बँक बॅलन्सची गरज नसते किंवा त्यासाठी कोणतंही विशेष कारण लागत नाही. याला कोणत्याही अटी किंवा सवलती नाहीत. शरीराच्या आकारावरून कोणाचाही अपमान करणं चुकीचंच आहे. बस एवढंच, असं रम्याने तिच्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.
