Madhubhai Kulkarni : आरएसएसचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचं ८८ व्या वर्षी निधन झालं. नरेंद्र मोदींना भाजपशी जोडण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. मोहन भागवत यांच्यासह अनेक वरिष्ठ स्वयंसेवकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक माधव विनायक (मधुभाई) कुलकर्णी यांचं गुरुवारी निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. वयोमानानुसार झालेल्या आजारामुळे काही दिवसांपासून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

मोदींना भाजपशी जोडणारे संघप्रचारक

मधुभाई कुलकर्णी यांनी १९८५ मध्ये गुजरातमध्ये प्रचारक म्हणून काम करताना नरेंद्र मोदी यांना भाजपमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळात नरेंद्र मोदी हे संघाचे विभाग प्रचारक होते. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी मोदींना राजकारणात पाठवण्याचा निर्णय घेतला होता, तर त्या प्रक्रियेत मधुभाईंचा सहभाग निर्णायक ठरला.

आरएसएस प्रमुखांची भेट, अंतिम श्रद्धांजली

दोन आठवड्यांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात जाऊन मधुभाईंची भेट घेतली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव आरएसएसच्या समर्पण कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी भैय्याजी जोशी, राज्यमंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक वरिष्ठ स्वयंसेवकांनी अंतिम श्रद्धांजली वाहिली.

बेळगावमध्ये जन्म, आजीवन संघकार्य

१७ मे १९३८ रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे मधुभाईंचा जन्म झाला. त्यांनी संघात विभागीय, उपविभागीय, प्रांतीय आणि प्रादेशिक प्रचारक म्हणून दीर्घकाळ कार्य केलं. वयोमानामुळे ते काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास होते.

देहदानाचा निर्णय

मधुभाई कुलकर्णी यांनी आयुष्यभर समाजसेवा केली. निधनानंतरही त्यांची देहदानाची इच्छा पूर्ण करण्यात आली असून त्यांचे पार्थिव रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, आर.के. दमाणी मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले आहे.