दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तातडीने सुरक्षा वाढवून तपास केला.
मुंबई : देशाची राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आला होता. फोन कॉलमध्ये लाल किल्ल्यावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. या माहितीची तत्काळ दखल घेत मुंबई पोलिसांनी दिल्ली पोलिसांना सतर्क केले. त्यानंतर लाल किल्ला परिसरात सुरक्षा वाढवून सखोल तपास करण्यात आला.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला फोन
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमवर फोन करून दिल्लीतील लाल किल्ला उडवून देण्याची धमकी दिली. हा फोन मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.
दिल्ली पोलिसांची तातडीने कारवाई
धमकीची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक केली. उत्तर जिल्हा पोलिसांना सतर्क करण्यात आले. तसेच बॉम्ब शोधक पथकांसह सुरक्षा यंत्रणांनी परिसराची कसून तपासणी केली.
तपासानंतर फेक कॉल असल्याचे समोर
सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आलेल्या सखोल तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा धोका आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी हा फोन 'हॉक्स कॉल' म्हणजेच फेक कॉल असल्याचे घोषित केले. सध्या या फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
यापूर्वीही मिळाल्या आहेत धमक्या
दिल्लीतील महत्त्वाच्या सरकारी इमारती, न्यायालये आणि इतर संवेदनशील ठिकाणांना यापूर्वीही अशाच प्रकारच्या बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये या धमक्या बनावट ठरल्या असल्या तरी सुरक्षा यंत्रणा प्रत्येक माहिती गांभीर्याने घेत आवश्यक तपास करत असतात.


