राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील डेहरा मोडजवळ मोहरीच्या तेलाचा एक टँकर उलटला. रस्त्यावर सांडलेलं तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी बादल्या आणि डबे घेऊन एकच गर्दी केली. रस्त्यावर अचानक आलेल्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
राजस्थानमधील अलवर-जयपूर हायवेवर मोहरीचं तेल घेऊन जाणारा एक टँकर उलटला. रस्त्यावर अचानक आलेल्या गाईला वाचवताना हा अपघात झाला. यानंतर सांडलेलं तेल गोळा करण्यासाठी लोकांनी बादल्या आणि डबे घेऊन जी धावपळ केली, त्याचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत.
हा टँकर अलवरहून जयपूरच्या दिशेने जात होता. त्यावेळी अचानक एक गाय टँकरसमोर आली. गाईला धडक बसू नये म्हणून चालकाने गाडी वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि टँकर रस्त्यावरच उलटला.
टँकर उलटताच आतलं मोहरीचं तेल रस्त्यावर सांडू लागलं. हे पाहताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. तेल वाहून जाण्याआधी ते गोळा करण्यासाठी ज्याला जे भांडं मिळेल ते घेऊन लोक तिथे पोहोचले.
या व्हायरल व्हिडिओमध्ये पुरुष, महिला, लहान मुलं आणि वृद्धही उलटलेल्या टँकरभोवती गर्दी करताना दिसत आहेत. बादल्या, कॅन आणि घरातील इतर भांड्यांमध्ये तेल भरण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडाली होती. जास्तीत जास्त तेल मिळवण्यासाठी लोकांची एकमेकांशी धक्काबुक्कीही सुरू होती.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला असून, हायवेवरच्या या अजब दृश्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
पाहा व्हायरल व्हिडिओ
दरम्यान, स्थानिक पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) महावीर सिंग यांनी सांगितलं की, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रेनच्या मदतीने उलटलेला टँकर बाजूला करण्यात आला आहे.
गाईला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला असला तरी, सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.






