महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी रोड रेल्वे स्थानकावर तिकीट क्लार्कने ड्युटीवर असताना फोन पाहण्यात मग्न राहून प्रवाशांकडे जास्तीच्या पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातल्या एका रेल्वे तिकीट क्लार्कचा कारभार सध्या चांगलाच चर्चेत आलाय. ड्युटीकडे दुर्लक्ष करून तिकीट देण्यासाठी प्रवाशांकडे जास्तीचे पैसे मागितल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या तिकीट बाबूचा एक व्हिडिओ एका प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओत तो तिकीट खिडकीवर प्रवाशांना तिकीट देण्याऐवजी फोन पाहण्यात मग्न असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
नील हरिया या 'X' युजरने भिवंडी रोड रेल्वे स्थानकावरून हा व्हिडिओ शेअर केलाय. ही घटना सकाळी ८:२५ च्या सुमारास घडल्याचा त्याचा दावा आहे. व्हिडिओमध्ये हा क्लार्क हसत हसत मोबाईलमध्ये गुंग असल्याचं दिसतंय. नील हरिया व्हिडिओ काढत असतानाही त्या क्लार्कला काही पडलेली नाही, किंवा त्याने प्रवाशाकडे पाहण्याची तसदीही घेतली नाही.
तिकीट बाबूने प्रवाशांकडे जास्तीचे पैसे मागितले आणि जास्त पैसे दिल्याशिवाय तिकीट देण्यास नकार दिला, असा आरोप हरियाने केला आहे.
“महाराष्ट्रातील ठाणे येथील भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर, तिकीट खिडकीवर मी अत्यंत धक्कादायक आणि चुकीची वागणूक पाहिली,” असं हरिया यांनी लिहिलंय.
हरियाने असाही आरोप केलाय की तिथे इतर रेल्वे कर्मचारीही उपस्थित होते. पण आपलं काम करण्याऐवजी ते तिकीट खिडकीजवळील एका खोलीत पार्टी करत होते. स्टेशन मास्टरच्या देखरेखीखाली असा गैरप्रकार कसा चालू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
या प्रकरणाची तातडीने आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी करत हरिया यांनी यात सामील कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने योग्य ते बदल करून कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामाबाबत जबाबदारीने वागण्याची खात्री करावी, अशीही विनंती त्यांनी केली.
ही तक्रार लवकरच 'रेल्वे सेवा'च्या निदर्शनास आली. त्यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना टॅग करून चौकशी करण्याचे निर्देश दिले.
“कृपया लक्ष द्या. @srdcmmumbaicr,” असे रेल्वे सेवा खात्याने उत्तर दिले आणि प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवले.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर इतर युजर्सनीही तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आपले रेल्वे कर्मचाऱ्यांसोबतचे वाईट अनुभव शेअर करत संताप व्यक्त केलाय.














