सार
आज (22 जानेवारी) अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या परिसरातून जनसभेला संबोधित केले.
Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशवासियांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत आज आपले प्रभू श्रीराम आले आहेत असे म्हटले. याशिवाय 22 जानेवारी तारीख केवळ दिनदर्शिकेवर लिहिलेली तारीखच नसून ती एक नव्या कालचक्राचे मूळ असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले.
पुढे पंतप्रधानांनी म्हटले की, “कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलला अयोध्येत आले आहेत. या शुभ दिवसानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा. रामलला आता टेंटमध्ये नव्हे तर भव्य मंदिरात राहणार आहे. त्याग आणि तपस्येनंतर रामलला अयोध्येत आले आहेत. मला विश्वास आहे की, प्रभू श्रीराम आपल्याला माफ करतील. आज आपले राम आले आहेत. आज आपल्याला श्रीराम मंदिर मिळाले आहे.”
गुलामीची मानसिकता मोडून राष्ट्र उभा राहिला आहे. हा काही सामान्य काळ नाही. प्रदीर्घ वियोगामुळे आलेला त्रास आता संपला आहे. संविधान अस्तित्वात आल्यानंतर प्रभू श्रीराम यांच्या अस्तित्वाबद्दल कायदेशीर लढाई लढली गेली. याशिवाय प्रत्येक युगातील व्यक्तींनी आपल्या-आपल्या शब्दांमध्ये आपल्या पद्धतीने रामांना व्यक्त केले आहे. ‘देव ते देश आणि राम ते राष्ट्रापर्यंत भक्ती असावी’ असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटले.
'राम आग नाही, राम उर्जा आहेत'- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात असेही म्हटले की, राम आग नाही, राम ऊर्जा आहे. राम वाद नाही, समाधान आहे. राम फक्त आपले नाहीत, ते सर्वांचे आहे. राम फक्त वर्तमान नाही, राम अनंत काल आहेत.
एक काळ असाही होता जेव्हा काहीजण म्हणायचे, राम मंदिर उभारले तर आग लागेल. अशा व्यक्तींना भारताच्या सामाजिक भावनेची पवित्रता कळाली नाही. रामललांच्या हे मंदिर भारतीय समाजातील शांतता, संयम, परस्परांमधील संवाद आणि समन्वयाचे प्रतीक आहे. आपण पाहात आहोत मंदिराचे हे बांधकाम आगीला जन्म देत नसून उर्जेला जन्म देत आहे.
पंतप्रधानांनी 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठानबद्दलचा शेअर केला अनुभव
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात 11 दिवसांच्या आपल्या विशेष अनुष्ठानदरम्यानचा अनुभवही शेअर केला. पंतप्रधानांनी म्हटले की, मी भाग्यवान आहे मला शरयूपर्यंतच्या यात्रेची संधी मिळाली. रामलला प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. मंदिर स्वच्छता अभियानही सुरू केले त्यालाही मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळाला. देशातील महत्त्वाच्या मंदिरांना भेट देण्यास पूजा-प्रार्थना करता आली. मला देशातील कानाकोपऱ्यातून रामायण वेगवेगळ्या भाषेत ऐकण्याची संधी मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललांची प्राणप्रतिष्ठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललांची प्राणप्रतिष्ठा अभिजित मुहूर्तावर करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुखे मोहन भागवत उपस्थितीत होते. रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचा आज दिवाळी सणासारखा आनंद साजरा केला जाणार आहे. सर्वत्र राम नामाचा गजरही गेला जात आहे.
आणखी वाचा :
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी या दिग्गजांनी लावली उपस्थिती, पाहा Photos
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा पहिला Video समोर, पाहा परिसरातील मनमोहक दृश्य
रामललांना श्रृंगारासाठी आठवडाभर या रंगांचे वस्र परिधान करण्याची प्रथा