पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. बॅलेट पेपरवर झालेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्येही काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, असं मोदी म्हणाले. चार राज्यांच्या निवडणूक निकालांवरून त्यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे.

काँग्रेसला पंतप्रधान मोदींचा सवाल

ईव्हीएम (EVM) मशीनवरून विरोधी पक्ष सतत प्रश्न उपस्थित करत असतात. याच मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला चिमटा काढलाय. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटकमधील एकूण २८ विधानपरिषद (MLC) जागांवर नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्याची आठवण करून देत, यात काँग्रेसनं किती जागा जिंकल्या? असा सवाल मोदींनी केलाय. या पोस्टसोबत त्यांनी एक विचार करणारा इमोजीही जोडलाय. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीये.

कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. तिथे झालेल्या ४ विधानपरिषद जागांच्या निवडणुका खूप महत्त्वाच्या होत्या. पण या चारही जागांवर भाजप-जेडी(एस) आघाडीने बाजी मारली आणि काँग्रेसच्या हाती भोपळाच आला. राज्यात सत्ता असूनही काँग्रेसला खातं उघडता आलं नाही, यावरून भाजप नेते आता काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत. ईव्हीएमवर खापर फोडणाऱ्या काँग्रेसला या निकालांवरून सत्ताधाऱ्यांनी चांगलंच घेरलंय.

इतर राज्यांमध्ये संमिश्र निकाल

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि समाजवादी पार्टीने काही जागा जिंकल्या. बिहारमध्ये आरजेडी, भाजप, जन सुराज पार्टी आणि अपक्षांनीही विजय मिळवला. विशेष म्हणजे, दरभंगा शिक्षक मतदारसंघात जन सुराज पार्टीने मिळवलेला विजय त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातोय. दुसरीकडे, महाराष्ट्रातील काही जागांची मतमोजणी अजूनही सुरू असल्याची माहिती आहे. या चारही राज्यांच्या निकालांचा संदर्भ देत मोदींनी काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं केलंय.

Scroll to load tweet…

बॅलेट पेपर विरुद्ध ईव्हीएम वाद पुन्हा पेटला

निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणीवर काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष गेल्या काही काळापासून आक्षेप घेत आहेत. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत निवडणुकांमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप काँग्रेस करत असते. पण भाजप हे आरोप नेहमीच फेटाळून लावतं. अशातच, बॅलेट पेपरवर झालेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकही जागा न मिळाल्याने मोदींनी केलेल्या या वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. दोन्ही बाजूचे नेते आपापल्या सोयीने या निकालांचे दाखले देत असल्याने ही राजकीय चर्चा आणखीनच रंजक झालीये.

काँग्रेसच्या रॅलीआधीच मोदींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं

येत्या १ नोव्हेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडी एक मोठी रॅली काढणार आहे. 'मत वाचवा - देश वाचवा' (Save Vote - Save Country) अशी या रॅलीची घोषणा आहे. निवडणूक प्रक्रियेबाबतचे आपले आक्षेप जनतेपर्यंत पोहोचवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पण या रॅलीच्या आधीच मोदींनी विधानपरिषद निकालांचा दाखला देत काँग्रेसवर टीका केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. एकीकडे निवडणुकांच्या पारदर्शकतेवर विरोधकांचे प्रश्न आणि दुसरीकडे भाजपकडून मिळणारी उत्तरं, यामुळे येत्या काळात या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी वाढण्याची शक्यता आहे.