मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. २०२४ च्या निवडणुकीत १३ कोटी (१३० मिलियन) मतदारांना वगळल्याच्या निषेधार्थ मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी २५० खासदारांनी प्रतिकात्मक महाभियोग चालवला. ज्ञानेश कुमार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, असा ठरावही विरोधकांनी मंजूर केला.
नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्ञानेश कुमार यांना पदावरून पायउतार व्हावंच लागेल. पुरावे समोर आल्यावर त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. निवडणूक आयोगाच्या आडून लपता येईल, या भ्रमात त्यांनी राहू नये. आज ना उद्या त्यांना जनतेला सामोरं जावंच लागेल, असा इशारा राहुल गांधींनी दिला. इतर सर्व मार्ग बंद झाल्यानेच विरोधक एकत्र आले असून ज्ञानेश कुमार यांच्यावरील महाभियोगावर चर्चा करत आहेत, असं राहुल यांनी स्पष्ट केलं. २०२४ च्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या १३० मिलियन (१३ कोटी) मतदारांना वगळण्यात आलं. हे मतदार बेकायदेशीर होते का? असा थेट सवाल राहुल गांधींनी विचारला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर प्रतिकात्मक महाभियोग चालवण्याची कारणं सांगितली. खर्गे यांच्या निवासस्थानी २५० खासदार ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात एकत्र जमले होते.
मोदी आणि अमित शाह यांचा सामना कसा करायचा, हे विरोधकांना चांगलंच माहीत आहे. पण निवडणूक आयोग कायमस्वरूपी त्यांचं हत्यार बनून राहू शकत नाही. संविधानाचं रक्षण करण्यासाठी सुरू असलेली ही एक पवित्र लढाई आहे. निवडणुकांमध्ये कितीही फेरफार केले किंवा घटनात्मक संस्थांवर ताबा मिळवला, तरी त्यांना जनतेचा आवाज ऐकावाच लागेल. हा भारताच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. लोकशाही उलथवून टाकण्यात ज्यांनी साथ दिली, त्यांचा विनाश करण्यासाठीच ही राजकीय एकजूट असल्याचं राहुल म्हणाले.
ज्ञानेश कुमार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, असा ठराव विरोधकांनी मतदानाद्वारे मंजूर केला. याप्रसंगी सभापतींच्या भूमिकेत असलेल्या मीरा कुमार म्हणाल्या की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही विरोधकांनी मोठं पाऊल उचललं असून जनतेच्या अधिकारांचं रक्षण व्हायलाच हवं. त्यानंतर राष्ट्रगीताने या कामकाजाची सांगता झाली.




