रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय की, या हाय-स्पीड सेवेमुळे व्यापारी, नोकरदार आणि सर्वसामान्यांचा प्रवास खूपच सोपा होणार आहे.
उत्तर प्रदेशातील लोकांसाठी येत्या काळात दिल्ली ते काशी हा प्रवास आणखी सोपा आणि वेगवान होणार आहे. सध्या दिल्लीहून वाराणसीला ट्रेनने जायला अनेक तास लागतात. पण भविष्यात बुलेट ट्रेनने हे अंतर अवघ्या ३ तास ३३ मिनिटांत पार करता येईल. देशात बुलेट ट्रेनचं नेटवर्क वाढवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. या कॉरिडॉरच्या माध्यमातून दिल्लीला आग्रा, कानपूर, लखनौ, अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसीसारख्या शहरांशी जोडण्याची योजना आहे. एवढंच नाही, तर हे नेटवर्क बिहारमधील पाटणापर्यंतही वाढवलं जाणार आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर कॉरिडॉरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील प्रवासाच्या संभाव्य वेळेबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या मते, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर उत्तर प्रदेशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील प्रवासाचा वेळ खूपच कमी होईल. बुलेट ट्रेन सुरू झाल्यावर दिल्लीहून वाराणसीला पोहोचायला फक्त ३ तास ३३ मिनिटे लागतील. दुसरीकडे, वाराणसीहून प्रयागराजला अवघ्या ३३ मिनिटांत पोहोचता येईल. वाराणसीहून लखनौला जायला १ तास २१ मिनिटे आणि पाटण्याला पोहोचायला फक्त १ तास लागेल.
यामुळे व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी यांच्यासोबतच उपचारांसाठी दुसऱ्या शहरात जाणाऱ्या रुग्णांनाही मोठा फायदा होईल, असं मानलं जात आहे.
दिल्लीहून कोणत्या शहरात पोहोचायला किती वेळ लागेल?
उत्तर कॉरिडॉरअंतर्गत दिल्लीला उत्तर प्रदेशातील अनेक मोठ्या शहरांशी जोडण्याची योजना आहे. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार—
दिल्ली ते आग्रा: ५९ मिनिटे
दिल्ली ते कानपूर: १ तास ४५ मिनिटे
दिल्ली ते लखनौ: २ तास १२ मिनिटे
वाराणसी ते आग्रा: २ तास ३४ मिनिटे
वाराणसी ते प्रयागराज: ३३ मिनिटे
वाराणसी ते पाटणा: १ तास
हे नेटवर्क सुरू झाल्यावर उत्तर प्रदेशासोबतच बिहारमधील प्रवाशांनाही या वेगवान रेल्वे सेवेचा फायदा मिळेल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, या कॉरिडॉरवर दर एका तासाला बुलेट ट्रेन चालवण्याची योजना आहे. त्यामुळे प्रवाशांना ट्रेनसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. बुलेट ट्रेनची सेवा फक्त मोठे व्यापारी किंवा श्रीमंत लोकांसाठीच नाही, तर मध्यमवर्ग, छोटे व्यापारी, सूक्ष्म आणि लघु उद्योगांशी जोडलेले लोक, तरुण आणि विद्यार्थ्यांनाही या सेवेचा फायदा होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
रेल्वेमंत्र्यांच्या माहितीनुसार, दिल्लीहून सिलीगुडीमार्गे गुवाहाटीपर्यंत प्रस्तावित उत्तर कॉरिडॉरचा आराखडा तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. प्रकल्पात वापरले जाणारे गर्डर आणि पिलरसारखे विविध भाग कारखान्यातच तयार करण्याची योजना आहे. यामुळे बांधकामाचा दर्जा उत्तम राहील आणि कामाचा वेगही वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




