IndiGoचा कॅप्टन घोषणा करत असतानाच प्रवाशाने केली मारहाण, कारण…WATCH VIDEO

| Published : Jan 15 2024, 11:34 AM IST / Updated: Jan 15 2024, 11:42 AM IST

Passenger punches IndiGo captain

सार

IndiGo Airline Video : इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने कॅप्टनला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विमान उड्डाणास उशीर होत असल्याची माहिती देण्यासाठी जेव्हा कॅप्टन समोर आले, तेव्हा या प्रवाशाने हल्ला केला.

IndiGo Airline Video : नवी दिल्लीमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. यामुळे दाट धुकेही पसरले आहे. धुक्यामुळे विमानांचे उड्डाण उशीराने होत असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

दिल्ली विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला उड्डाण भरण्यास तब्बल 13 तास ​​उशीर झाला. यामुळे संतापलेल्या एका प्रवाशाने विमानाच्या कॅप्टनला मारहाण केली. फ्लाइटचे उशीराने उड्डाण होत असल्याची  घोषणा करण्यासाठी कॅप्टन प्रवाशांसमोर आले, तेव्हा एक प्रवासी कॅप्टनच्या अंगावर धावून गेला आणि त्यांना मारहाणही केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विमान उड्डाणास उशीर होत असल्याची घोषणा करत होते कॅप्टन

पिवळ्या रंगाचे हुडी घातलेला एक प्रवासी इंडिगो फ्लाइटच्या कॅप्टनच्या दिशेने धावत गेला आणि त्याला मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेवेळी कॅप्टन विमान उड्डाणास उशीर होत असल्याची घोषणा करत होते.

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कॅप्टनला मारहाण करणाऱ्या प्रवाशाविरोधात कारवाई करण्याची मागणी काही जणांनी केली आहे. तर दुसरीकडे इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचेही तक्रार काही लोक करत आहेत.

पायलट बदलल्याने विमान उड्डाणास झाला उशीर?

फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स (FDTL)च्या नियमांमुळे पायलट बदलल्यानंतर कॅप्टनने विमान उड्डाणास उशीर होत असल्याची घोषणा केली. व्हायरल व्हिडीओतील माहितीनुसार विमान उड्डाणास तब्बल 13 तास उशीर झाल्याचे समजतेय. विमानाचे पायलट ड्युटीची वेळ पूर्ण करून परतले. यानंतर दुसरा क्रू पाठवण्यात आला, असे म्हटले जात आहे.

कधी घडली आहे ही घटना?

पायलटला मारहाण केल्याची ही घटना रविवारी (14 जानेवारी) घडली आहे. हे विमान दिल्लीहून गोव्याला जात होते. मारहाण करणाऱ्या प्रवाशाला CISFच्या जवानांनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. इंडिगो एअरलाइन्सने याबाबत दिल्ली पोलिसात याबाबत तक्रार नोंदवली आहे.

आणखी वाचा : 

Ram Mandir Pran Pratishta : मॉरिशस सरकारची मोठी घोषणा, 22 जानेवारीला मिळणार 2 तासांची विशेष सुटी

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मौनी बाबा सोडणार मौनव्रत, वयाच्या 10व्या वर्षी केला होता संकल्प

Ramcharitmanas : रामचरितमानसच्या मागणीत मोठी वाढ, छपाईसाठी गीता प्रेसमध्ये दिवसरात्र काम सुरू