Andaman Gas Discovery : ऑईल इंडिया लिमिटेडने अंदमान समुद्रात नैसर्गिक वायूची एक नवीन विहीर शोधून काढली आहे. अंदमान बेटाच्या पूर्व किनाऱ्यापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री विजयपुरम-३ या विहिरीत वायू असल्याचं केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी स्पष्ट केलं आहे.
Andaman Gas Discovery : एकीकडे मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला कच्च्या तेलासोबतच नैसर्गिक वायूच्या तुटवड्याचाही सामना करावा लागत आहे. अशा कठीण काळात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑईल इंडिया लिमिटेडने (Oil India Ltd.) अंदमान समुद्रात नैसर्गिक वायूने भरलेली आणखी एक विहीर शोधून काढली आहे.

श्री विजयपुरम-३ विहीर
याबद्दलची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केली. त्यांनी लिहिलं की, 'अंदमान बेटाच्या पूर्व किनाऱ्यापासून १५ किलोमीटर अंतरावर खोदलेल्या श्री विजयपुरम-३ या विहिरीत नैसर्गिक वायू सापडला आहे. ही विहीर १९०० मीटरपेक्षा जास्त खोल आहे. फ्लेअरिंगद्वारे (म्हणजे वायू जाळून) विहिरीत वायू असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.'
विशेष म्हणजे, अंदमान समुद्रात वायूच्या शोधासाठी आतापर्यंत एकूण ३ विहिरी खोदण्यात आल्या आहेत. यापैकी वायू सापडलेली ही दुसरी विहीर ठरली आहे.


