लाल किल्ला स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी उमर उन नबी आणि त्याच्या साथीदारांनी हल्ल्याच्या आधी तब्बल दोन वर्षं दिल्लीत राहून सविस्तर रेकी आणि पाहणी केली होती, असं NIA च्या चार्जशीटमध्ये स्पष्ट झालं आहे.

नवी दिल्ली: लाल किल्ला स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दाखल केलेल्या ७५०० पानांच्या आरोपपत्रातून (चार्जशीट) आणखी नवीन माहिती समोर आली आहे. या चार्जशीटनुसार, आत्मघाती हल्ल्यात ठार झालेला उमर नबी हाच या स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता.

उमर नबी अनेक वर्षं दिल्लीत राहून काम करत होता. त्याने प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'अन्सार गझावत-उल-हिंद'च्या वेगवेगळ्या गटांना एकत्र जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या दहशतवादी संघटनेचे 'अल-कायदा'शी संबंध असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

दहशतवादी कारवायांचं नियोजन करण्यासाठी आरोपी 'सिग्नल'सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मचा वापर करत होते. यावरून ते एकमेकांना गुप्त संदेश पाठवायचे. तपास पथकाने सशस्त्र संघर्षाचं समर्थन करणारी अनेक कागदपत्रंही जप्त केली आहेत. स्फोटाच्या ठिकाणाहून मिळालेल्या अवशेषांची डीएनए तपासणी केल्यानंतर, स्फोटात ठार झालेली व्यक्ती उमर नबीच असल्याची खात्री तपास यंत्रणेला झाली.

स्फोट घडवून आणण्याचा शेवटचा आदेश (कमांड) गाडीतूनच देण्यात आला होता, असंही चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. हा आदेश स्वतः उमर नबीनेच अंमलात आणला आणि त्यानेच स्फोट घडवला. NIA ने गेल्या वर्षी मे महिन्यात हे ७५०० पानांचं सविस्तर आरोपपत्र विशेष न्यायालयात सादर केलं होतं.