नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जेवणावरून झालेल्या वादातून एका ४१ वर्षीय पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. गणेशोत्सवासाठी डान्स प्रॅक्टिसला जाण्यापूर्वी पत्नीने जेवण वाढण्यास नकार दिल्याने हा प्रकार घडला.
नागपूरमध्ये जेवणावरून झालेल्या एका किरकोळ वादाचं पर्यवसान हत्येत झालं आहे. एका ४१ वर्षांच्या पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. आरोपी पतीचं नाव कृष्णाकांत यादव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णाकांत बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घरी आला. त्याने पत्नी यामिनीला स्वतःसाठी आणि दोन मुलांसाठी जेवण वाढायला सांगितलं. पण, यामिनी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी डान्स प्रॅक्टिसला जायच्या तयारीत होती. त्यामुळे तिने कृष्णाकांतला स्वतः जेवण वाढून घेण्यास सांगितलं.
याच गोष्टीवरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. रागाच्या भरात कृष्णाकांतने यामिनीची मान पकडली, तिला ठोसे मारले आणि बेडवर फेकून दिलं.
थोड्या वेळाने यामिनीने अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. त्यामुळे कृष्णाकांत तिच्यासाठी औषध आणायला बाहेर गेला. पण तोपर्यंत तिची प्रकृती जास्तच बिघडली. त्याने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
हे दाम्पत्य मूळचं उत्तर प्रदेशचं असून, साधारण एक वर्षापूर्वी ते नागपूरला स्थायिक झाले होते. कृष्णाकांत एका विमा कंपनीत काम करतो, तर यामिनी गृहिणी होती.
सुरुवातीला मानकापूर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. पण, शवविच्छेदन अहवालात यामिनीचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी कृष्णाकांत विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
