सार
New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री (15 फेब्रुवारी) एक मोठी दुर्घटन घडली आहे. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 11 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे. ही दुर्घटना रेल्वे उशिराने धावत असल्याच्या कारणास्तव झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्थानकात तुफान गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली.
एलएनजेपी रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकिय अधिकारी यांनी 15 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. यामध्ये 10 महिला, 3 मुले आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लेडी हर्डिंग रुग्णालातूनही 3 जणांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.
चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू
नवी दिल्लीतील रेल्वे स्थानक क्रमांक 14 आणि 15 दरम्यान रात्री 8 वाजता गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रवासी प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते. स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.. याशिवाय चार अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पाठवण्यात आल्या. रेल्वेकडून सदर दुर्घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरुन दु:ख व्यक्त केले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सध्या स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे ट्विट
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर दुर्घटनेसंदर्भात ट्विट केले आहे. अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, “नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकात सध्या स्थिती नियंत्रणात आली आहे. दिल्ली पोलीस आणि आरपीएफचे जवान घटनास्थळी आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याशिवाय अचानक वाढलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी नागरिकांना चेंगराचेंगरीच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली आहे.”
दिल्लीच्या उपराज्यपालांनीही दिली प्रतिक्रिया
दिल्लीचे उपराज्यपाल वीके सक्सेना यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिताना वीके सक्सेना यांनी म्हटले की, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांशी बोललो आहे आणि त्यांना परिस्थिती हाताळण्यास सांगितले आहे.मुख्य सचिवांना मदत कर्मचारी तैनात करण्यास सांगितले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस आयुक्तांना घटनास्थळी उपस्थित राहण्याचे आणि मदत उपाययोजनांचे नियंत्रण घेण्याचे निर्देश दिले आहेत. मी सतत कामांवर लक्ष ठेवत आहे."
आणखी वाचा :
कुंभ मेळ्यात स्वच्छतेचा विश्वविक्रम
राजीव कुमार यांच्यानंतर कोण होणार भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त?