
एकनाथ शिंदे: मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा शिकवण्यासाठी राबवण्यात आलेल्या अभियानाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन विभागाचे आभार मानले. या अभियानातून जवळपास 1 लाख 60 हजार अमराठी नागरिकांनी मराठी भाषा शिकल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी सुमारे 15 ते 20 हजार ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांना प्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमाला आपण स्वतः उपस्थित होतो, असेही शिंदे म्हणाले.रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये जुजबी मराठी शिकण्याची आवड दिसून आल्याचे सांगत, साहित्यिक, लेखक आणि मराठी भाषेतील तज्ज्ञांच्या सहभागातून हे अभियान सुरू ठेवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. अनेकांच्या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले. अन्य भाषिकांमध्ये मराठीचा प्रचार आणि प्रसार होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि तालुक्यांतून आलेल्या महिलांनी आपल्याला ‘लाडका भाऊ’ म्हणून राख्या बांधल्याचे शिंदे यांनी सांगितले. 2024 मधील महायुतीच्या 232 जागांच्या विजयात ‘लाडक्या बहिणींचा’ आशीर्वाद महत्त्वाचा असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या इतर योजना यापुढेही सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.