
Pratap Sarnaik
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली एक वर्षाची मुदतवाढ सर्वांना बंधनकारक असल्याचे सांगितले. मात्र मुदतवाढ मिळाली म्हणजे मराठी शिकण्याची अट संपलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबर आणि रॅपिडो चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी जुजबी मराठी येणे आवश्यक असल्याचे सरनाईक म्हणाले.मराठी भाषा अभियान सुरूच राहणार असून राज्यात 1,800 शिक्षक आणि 180 वर्ग सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 105 दिवसांत 1 लाख 65 हजार 600 चालकांनी मराठी शिकल्याचे सांगत, उर्वरित चालकांनी एक वर्षाच्या मुदतीत मराठी शिकावे आणि त्यानंतर पुन्हा मुदतवाढ मागणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.सरकार कोणाचाही बॅच किंवा लायसन्स रद्द करून रोजगार हिरावून घेण्याच्या भूमिकेत नसल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. मात्र महाराष्ट्रात व्यवसाय आणि रोजगार करायचा असेल तर मराठी बोलणे आवश्यक असल्याची परिवहन विभाग आणि शिवसेनेची भूमिका कायम असल्याचे त्यांनी म्हटले.धाराशिवमधील राजकीय घडामोडींवर बोलताना आणखी काही लोकप्रतिनिधी आणि नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मराठी भाषा अभियानाच्या कार्यक्रमात हिंदी/भोजपुरी गाणे लावल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्टीकरण देत ही चूक अनावधानाने झाल्याचे सांगितले आणि एकनाथ शिंदे यांनी संबंधितांना सूचना केल्याचे नमूद केले.