MP Harda Factory Blast : फटाक्यांच्या कारखान्यात अग्नितांडव! 12 हून अधिक लोकांचा मृत्यू, 200 जखमी

| Published : Feb 06 2024, 06:15 PM IST / Updated: Feb 06 2024, 06:28 PM IST

 MP Harda Factory Blast

सार

मध्य प्रदेशातील हरदा शहरातील एका फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागल्यामुळे फटाके उत्पादन युनिट शक्तिशाली स्फोटाने हादरले. या दुर्दैवी अपघातात 12 लोक ठार झाले आणि कारखान्यात उपस्थित 200 हून अधिक लोक जखमी झाले.

MP Harda Factory Blast : मध्य प्रदेशातील हरदा शहरातील एका फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागल्यामुळे फटाके उत्पादन युनिट शक्तिशाली स्फोटाने हादरले. या दुर्दैवी अपघातात 12 लोक ठार झाले आणि कारखान्यात उपस्थित 200 हून अधिक लोक जखमी झाले. या विनाशकारी स्फोटात कारखान्याच्या परिसरातील जवळपास 60 घरेही उद्ध्वस्त झाली आहेत.

बचावकार्य सुरू

हे अग्नितांडव किती भीषण होते हे सोशल मीडियावर फिरत असलेले व्हिडीओ बघून लक्षात येते. अंगावर काटा येणारे हे दृश्य फटाक्यांच्या कारखान्यातील आहे. या व्हिडिओत कारखान्याजवळील गोंधळाचे दृश्य स्पष्टपणे दिसून येत आहे, ज्यात आगीपासून वाचण्यासाठी लोक धावपळ करत आहेत. या कारखान्याला आगीच्या प्रचंड लोटांनी वेढले आहे व थरकाप उडवणारे स्फोटांचे आवाज देखील ऐकू येत आहेत.

हरदाचे जिल्हाधिकारी ऋषी गर्ग यांनी या दुःखद घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, या ठिकाणी बचावकार्य वेगाने सुरू आहे, जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहेत व तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जे लोक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारांसाठी भोपाळ आणि इंदूरला हलवण्यात आले आहे.

शहरात सर्वत्र धुराचे साम्राज्य

हरदाचे पोलिस अधीक्षक संजीव कांचन यांनी स्फोटाच्या भीषणतेचे वर्णन करताना सांगितले की, आग लागल्यानंतर संपूर्ण शहर काळ्या धुरात गुरफटले होते. अपघातस्थळावर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल त्वरित हजर झाले आहे आणि त्यांनी वेगाने बचावकार्यास सुरुवात केली आहे. तसेच अग्नितांडव आटोक्यात आणण्यासाठी आजूबाजूच्या भागातील आपत्कालीन सेवांना पाचारण करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री मोहन यादव यांचे बचावकार्याकडे जातीने लक्ष

या दुर्दैवी घटनेबद्दल माहिती मिळताच मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्वरित पावले उचलत प्रशासन आणि बचाव पथकांशी समन्वय साधला आणि घटनास्थळी परिस्थितीचे आकलन करण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवले. या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यभरातील रुग्णालयांमधील बर्न युनिट्सना हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते, तर इंदूर आणि भोपाळसारख्या प्रमुख शहरांतील अग्निशमन दलांनी आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.

पीडितांसाठी मदत जाहीर

झालेल्या घटनेबद्दल मुख्यमंत्री यादव यांनी शोक व्यक्त केला आहे व पीडितांचे सांत्वन केले आहे. तसेच जखमींना आर्थिक मदत आणि मोफत वैद्यकीय सेवा यासह आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देखील दिले आहे. आगीचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आणि पीडितांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. एका X पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (Prime Minister's National Relief Fund) प्रत्येक मृताच्या नातेवाईकांसाठी 2लाख रुपये तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आणखी वाचा

'संपूर्ण गांधी कुटुंब मला ते बिस्किट खायला लावू शकले नाहीत', आसामच्या मुख्यमंत्र्यांनी VIRAL VIDEO वरून साधला निशाणा

अरविंद केजरीवालांवर ईडीची मोठी कारवाई, खासगी सचिव, आप नेत्यांच्या घरांवर धाड टाकली

Maharashtra State Government Vayoshri Yojana: ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, वयोश्री योजनेतून मिळणार लाभ