सार
Ram Mandir Ayodhya : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. मंगळवारी (23 जानेवारी) संध्याकाळच्या सुमारास मंदिराच्या गर्भगृहामध्ये नेमके काय घडले? जाणून घ्या…
Ram Mandir Ayodhya : अयोध्येमधील भव्य श्री राम मंदिरामध्ये रामलला विराजमान झाले आहेत. प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात अयोध्येमध्ये गर्दी करत आहेत. भाविकांची गर्दी हाताळण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.
यादरम्यान, प्रभू श्री रामाचे सर्वात मोठे भक्त हनुमानजी देखील रामललांच्या दर्शनासाठी मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले होते आणि त्यांनी प्रभूंचे दर्शन घेतल्याची माहिती समोर आली. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या सुंदर घटनेची माहिती शेअर केली आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शेअर केली ही माहिती
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मंगळवारी संध्याकाळी जवळपास 5.50 वाजता मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजातून एक माकड गर्भगृहात शिरले आणि मूर्तीजवळ पोहोचले. रामललांच्या मूर्तीच्या काळजीपोटी मंदिराबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्यांनी यानंतर लगेचच माकडाच्या दिशेने धाव घेतली.
यावेळेस पोलीस माकडाच्या दिशेने धावत जाताच माकड अतिशय शांतपणे उत्तरेकडील दरवाज्याच्या दिशेने धावले. पण गेट बंद असल्याने ते पूर्व दिशेला सरकले आणि भाविकांमधून मार्ग शोधत, कोणालाही त्रास न देता मंदिराबाहेर पडले. याबाबत सुरक्षा कर्मचारी म्हणाले की, ”जणू हनुमानजी स्वतः रामललाच्या दर्शनासाठी आले”.
प्रभू श्री रामाचे मंदिर भाविकांसाठी खुले
श्री राम मंदिराचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा सोमवारी (22 जानेवारी) पार पडला. यानंतर अयोध्येतील श्री राम मंदिर मंगळवारपासूनच (23 जानेवारी) भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. रामललांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंगळवारी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. पण भाविकांना ठराविक वेळामध्ये मंदिराचे दर्शन करता येणार आहे. सकाळी 7 वाजेपासून ते सकाळी 11:30 वाजेपर्यंत व दुपारी 2 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भाविकांना रामललांचे दर्शन घेता येईल. पहिल्या दिवशी पहाटे 3 वाजेपासूनच भाविकांनी मंदिराबाहेर मोठी गर्दी केली होती.
आणखी वाचा
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासंदर्भात लालकृष्ण अडवाणींचे भावूक पत्र, या 2 व्यक्तींचे मानले आभार
Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी, पहाटेच्या पहिल्या आरतीचा पाहा VIDEO
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून ते आरतीपर्यंतचे खास फोटो