पुष्कर मेळावा २०२६ मध्ये 'पिंकी' नावाची एक छोटी म्हैस सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनली. फक्त २ फूट उंचीच्या या म्हशीने महाराष्ट्रातून १,१०० किलोमीटरचा प्रवास केला. तिचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, तिची किंमत चक्क १ कोटी रुपये असल्याचा दावा केला जात आहे.

मुंबई : राजस्थानमधील पुष्कर पशुमेळावा २४ नोव्हेंबर २०२६ रोजी संपला असला तरी, तिथलं एक अनोखं आकर्षण अजूनही चर्चेत आहे. अवघी दोन फूट उंची असलेली 'पिंकी' नावाची म्हैस सध्या सोशल मीडिया आणि पर्यटकांमध्ये कुतूहलाचा विषय बनली आहे.

नेहमीच्या धिप्पाड जनावरांपेक्षा पिंकीची उंची खूपच कमी असल्याने ती तिथे उठून दिसत होती. अंदाजे तीन वर्षांच्या या म्हशीला तिचे मालक आणि पशुपालक सोहिल शकील यांनी महाराष्ट्रातील ठाण्याहून पुष्करला आणलं होतं.

View post on Instagram
 

या प्रवासात तिने तब्बल १,१०० किलोमीटर अंतर पार केलं. इतक्या दुरून येऊनही पिंकीने या मेळाव्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. देश-विदेशातून आलेले पर्यटक तिला जवळून पाहण्यासाठी गर्दी करत होते. लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही तिचं भारी अप्रूप वाटत होतं आणि अनेकजण तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत होते.

पिंकीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामुळे मेळाव्याच्या बाहेरही तिची मोठी हवा झाली आहे.

पिंकीची उंची फक्त दोन फूट का आहे? मालकाने सांगितलं कारण

पिंकीची उंची इतकी कमी असल्यामुळे साहजिकच तिच्या प्रजाती आणि शारीरिक वाढीबद्दल लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. मात्र, तिचे मालक सोहिल शकील यांनी स्पष्ट केलं की ती कोणत्याही खास 'मिनिएचर' (लहान) प्रजातीची म्हैस नाही.

शकील यांच्या मते, तिची ही लहान शरीरयष्टी पूर्णपणे नैसर्गिक आहे. सर्वसामान्य म्हशींच्या तुलनेत तिची शारीरिक वाढ वेगळ्या पद्धतीने झाली असली तरी, तिच्या या वेगळेपणामुळेच ती लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.

तिची आईदेखील तुलनेने लहानच होती, जिची उंची साधारण तीन फूट होती. ती दररोज सुमारे दोन लिटर दूध द्यायची असंही त्यांनी सांगितलं.

पिंकीने अद्याप कोणत्याही वासराला जन्म दिलेला नाही. तिच्या या अनोख्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे ती पुष्कर मेळाव्यात पशुपालक आणि पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरली.

पिंकीची किंमत खरंच १ कोटी रुपये आहे का? मालकाने दिलेली माहिती

उंचीव्यतिरिक्त, पिंकीच्या अंदाजित किमतीचीही सध्या मोठी चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये तिची किंमत २० लाख ते १ कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा केला जात आहे.

असं असलं तरी, तिच्या मालकाने यापैकी कोणत्याही आकड्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही किंवा तिच्या खऱ्या बाजारभावाबद्दल कोणतीही सार्वजनिक घोषणा केलेली नाही.

शकील यांना वाटतं की पिंकी ही जगातील सर्वात लहान म्हैस असू शकते. मात्र, 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स' किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून या दाव्याची अद्याप अधिकृत नोंद झालेली नाही.

पिंकीचे मालक महाराष्ट्रातील ठाणे येथे एक शेती फार्म चालवतात, जिथे त्यांनी इतरही अनेक अनोखे प्राणी पाळले आहेत. पुढच्या वर्षी पुष्कर मेळाव्यात असे आणखी काही प्राणी आणण्याचा त्यांचा विचार आहे.