नवरदेव आणि नवरीने त्यांच्या लग्नाच्या मंडपात पारदर्शक फुग्यासारख्या गोळ्यामधून एन्ट्री घेऊन पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या अनोख्या 'झोर्ब-लाईक' एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबई : नवरदेव आणि नवरीने त्यांच्या लग्नात एका मोठ्या पारदर्शक फुग्यासारख्या गोळ्यामधून एन्ट्री घेत सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. त्यांचा हा प्रवेश म्हणजे लग्न होतं की झोर्बिंगचा खेळ, असा प्रश्न सोशल मीडियावर युजर्स विचारत आहेत. या जोडप्याच्या एन्ट्रीचा व्हिडिओ विविध प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आला आणि तो चांगलाच व्हायरल झाला.
व्हिडिओमध्ये नवरदेव आणि नवरी पारंपरिक लग्नाच्या कपड्यांमध्ये दिसतात. ते एका मोठ्या पारदर्शक गोळ्याच्या आत उभे राहून हळूहळू चालत मंडपात प्रवेश करतात. हा गोळा अगदी झोर्ब (Zorb) सारखा दिसतो. झोर्ब म्हणजे एक मोठा फुगवलेला चेंडू असतो, ज्यामध्ये माणसं आत जाऊन सुरक्षितपणे फिरू शकतात. झोर्बिंग हा मुळात थीम पार्क किंवा मनोरंजनाचा प्रकार आहे, त्यामुळे लग्नात त्याचा असा वापर खूपच विचित्र वाटतो.
हातात हात घालून ते जोडपं पारदर्शक फुग्यातून चालताना पाहून लग्नाला आलेले पाहुणे चक्रावून गेले. या अनोख्या एन्ट्रीचा व्हिडिओ बघून इंटरनेटवर लोकांमध्ये चर्चेला उधाण आलं. लोक या मोठ्या फुग्यामागे नक्की काय उद्देश असावा, याचे स्वतःचे तर्कवितर्क लावत आहेत.
पहा व्हायरल व्हिडिओ
एका युजरने मस्करीत म्हटलं की, ज्याने हे ठरवलं तो कदाचित त्यांना आठवण करून देत होता की ते दोघे एका 'बुडबुड्या'त (bubble) जगत आहेत, जो लग्नानंतर फुटणारच आहे.
दुसऱ्या एका युजरने व्यावसायिक दृष्टिकोनातून टिप्पणी केली आणि म्हटलं की वेडिंग प्लॅनरला झोर्ब विकणं हे एक मोठं अचिव्हमेंटच आहे. तर काही जण या एन्ट्रीवर नाराज दिसले, त्यांना यात काहीही आकर्षक वाटलं नाही आणि पाहुण्यांना हे इतकं का आवडलं असा प्रश्नही त्यांनी विचारला.
















