Lucknow Cinema Hall Fight Erupts Over Child at A Rated Dhurandhar 2 Screening: लखनऊच्या एका थिएटरमध्ये 'धुरंधर 2' सिनेमाला लहान मुलाला आणल्यामुळे एका कुटुंबाचा स्टाफसोबत वाद झाला. या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लहान मुलांना असे सिनेमे दाखवणं कितपत योग्य आहे, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Lucknow Cinema Hall Fight Erupts Over Child at A Rated Dhurandhar 2 Screening: लखनऊमधील एका सिनेमागृहात एका कुटुंबाने चांगलाच गोंधळ घातला. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग अभिनित 'धुरंधर 2' हा सिनेमा पाहण्यासाठी हे कुटुंब आपल्या लहान मुलाला घेऊन आलं होतं. पण हा सिनेमा फक्त प्रौढांसाठी म्हणजेच 'A' सर्टिफिकेट असलेला सिनेमा असल्याने थिएटर स्टाफने त्यांना अडवलं. यावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की थेट मारामारीच झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पालकत्वाच्या जबाबदारीवर एक मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सेन्सॉर बोर्डाने 'धुरंधर 2' या सिनेमाला त्यातल्या प्रचंड हिंसाचारामुळे 'Adults Only' म्हणजेच 'A' सर्टिफिकेट दिलं आहे. असं असतानाही, लखनऊच्या एका मॉलमध्ये हे कुटुंब लहान मुलाला घेऊन सिनेमाला आलं. स्टाफने त्यांना नियमानुसार अडवल्यावर बाचाबाची सुरू झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. व्हायरल झालेल्या 24 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये थिएटरच्या आतच लोक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहेत. एकीकडे स्क्रीनवर सिनेमा सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने इतर प्रेक्षकही चक्रावून गेले. विशेष म्हणजे, आठवडाभरापूर्वी एमराल्ड मॉलमधील आयनॉक्समध्येही असाच प्रकार घडला होता, जिथे एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलाला सिनेमाला नेण्याचा प्रयत्न केला होता.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या कुटुंबावर, विशेषतः पालकांवर जोरदार टीका केली आहे. 'अशा हिंसक सिनेमांचा लहान मुलांच्या मनावर आणि वागणुकीवर वाईट परिणाम होतो,' असं अनेकांचं म्हणणं आहे. 'लहान मुलांसमोर अशी मारामारी केल्याने त्यांच्यासाठी या गोष्टी सामान्य होऊन जातात आणि वडिलांचं असं वागणं मुलांवर चुकीचे संस्कार करतं,' अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

काही जणांच्या मते, भारतीयांमध्ये भावनिक बुद्धिमत्ता (emotional intelligence) आणि संयम कमी होत चालल्याने अशा घटना घडत आहेत. 'नियम स्पष्टपणे लिहिलेले असताना पालक मुलांना अशा ठिकाणी का आणतात?' असा सवालही अनेकजण विचारत आहेत. 'कला सगळ्यांसाठी सारखी नसते आणि ज्यांना तिचं गांभीर्य कळत नाही, ते असे वाद निर्माण करतात,' असंही मत काही जणांनी मांडलं आहे.