आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या 'स्कॅन अँड रजिस्टर' सुविधेने २५ कोटी ओपीडी रजिस्ट्रेशनचा टप्पा ओलांडला आहे. या डिजिटल सुविधेमुळे QR कोड स्कॅन करून रुग्णांची नोंदणी करणं सोपं झालं असून, देशातील ३०,८०० पेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा वेळ वाचत आहे.

देशात डिजिटल हेल्थकेअरमध्ये एक मोठा बदल घडतोय. आयुष्मान भारत डिजिटल मिशनची (ABDM) 'स्कॅन अँड रजिस्टर' सुविधा आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या सेवेच्या माध्यमातून तब्बल २५ कोटी ओपीडी रजिस्ट्रेशनचा टप्पा पार झाला आहे. यावरून देशभरात डिजिटल आरोग्य सेवांचा वापर किती वाढला आहे, हे स्पष्ट दिसतंय, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.

या 'स्कॅन अँड रजिस्टर' सुविधेमुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाऊन लांबच लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाही. रुग्णालयात लावलेला एक विशिष्ट QR कोड रुग्णाला आपल्या मोबाईलमधील ABDM-सक्षम पर्सनल हेल्थ रेकॉर्ड (PHR) ॲप्लिकेशनने स्कॅन करायचा असतो. एकदा का तुम्ही परवानगी दिली की, तुमची आभा (ABHA) प्रोफाइल हॉस्पिटलसोबत शेअर होते आणि तुमचं ओपीडी रजिस्ट्रेशन लगेच होऊन जातं. यासाठी कोणताही कागदी फॉर्म भरण्याची किंवा वेगळी नोंदणी करण्याची गरज लागत नाही. या सेवेमुळे रजिस्ट्रेशन काउंटरवरची गर्दी कमी होते आणि रुग्णालयाचं कामही अधिक कार्यक्षमतेने होतं.

आरोग्य मंत्रालयाने पुढे सांगितलं की, 'स्कॅन अँड रजिस्टर' सेवेचे २५ कोटींचे व्यवहार हे नागरिक आणि आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांचा भारताच्या डिजिटल आरोग्य प्रणालीवरील वाढता विश्वास दाखवतात. ही सेवा सुरू झाल्यापासून, देशातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिजिटल आरोग्य सेवांपैकी एक बनली आहे. यामुळे लाखो रुग्णांसाठी ओपीडी नोंदणी सोपी झाली आहे.

देशभरात कुठे-कुठे आहे ही सुविधा?

सध्या ही 'स्कॅन अँड रजिस्टर' सुविधा देशातील ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ७५६ जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. एकूण ३०,८०० आरोग्य केंद्रांमध्ये ही सोय उपलब्ध आहे, ज्यात २४,३२३ सरकारी आणि ६,४८१ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारं, रुग्णालयं आणि डिजिटल सोल्यूशन कंपन्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच ही सेवा इतक्या वेगाने पसरली आहे.

रुग्णांसाठी मोठा दिलासा

दररोज सरासरी जवळपास ४ लाख रुग्ण ओपीडी नोंदणीसाठी या सेवेचा वापर करतात. यावरून लोकांचा डिजिटल आरोग्य सेवांवरचा विश्वास किती वाढला आहे, हे दिसतं. या सेवेमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि ज्यांना सतत हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, अशा लाखो रुग्णांसाठी नोंदणीचा अनुभव पूर्णपणे बदलला आहे. फक्त QR कोड स्कॅन करून रुग्णाची माहिती त्याच्या आभा (ABHA) प्रोफाइलमधून आपोआप घेतली जाते, ज्यामुळे रुग्णांचा वेळ वाचतो आणि नोंदणी प्रक्रिया जलद, सोयीस्कर आणि सोपी होते. मंत्रालयाने पुढे सांगितले की, ही सेवा केवळ नोंदणीपुरती मर्यादित नाही, तर नागरिकांना त्यांचे आभा-लिंक्ड डिजिटल आरोग्य रेकॉर्ड सहजपणे मिळवण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी एक माध्यम म्हणूनही काम करते.

कोणती राज्यं आघाडीवर?

या सेवेचा वापर करण्यात बिहार राज्य देशात आघाडीवर आहे. तिथे ७.३० कोटींहून अधिक 'स्कॅन अँड रजिस्टर' व्यवहार झाले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश (४.०९ कोटी), आंध्र प्रदेश (३.३८ कोटी) आणि जम्मू-काश्मीर (१.३९ कोटी) यांचा क्रमांक लागतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये या सेवेचा मोठ्या प्रमाणावर झालेला वापर हे ABDM-सक्षम डिजिटल सेवांच्या यशस्वी अंमलबजावणीचे उदाहरण आहे.

डिजिटल बदलावर NHA चे CEO काय म्हणाले?

या यशाबद्दल बोलताना, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (NHA) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. सुनील कुमार बर्णवाल म्हणाले, "'स्कॅन अँड रजिस्टर'द्वारे २५ कोटी ओपीडी नोंदणीचा टप्पा ओलांडणे, हे नागरिक आणि आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांनी भारताच्या डिजिटल आरोग्य प्रणालीवर ठेवलेला वाढता विश्वास दर्शवतो. ओपीडी नोंदणीसारखी एक सामान्य प्रक्रिया सोपी करून, या सेवेने रुग्णांची सोय वाढवली आहे आणि रुग्णालयांना त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत केली आहे. हे यश आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या देशात एक सुरक्षित आणि नागरिक-केंद्रित डिजिटल आरोग्य प्रणाली तयार करण्याच्या क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे."

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी रुग्णालयं

सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये, दिल्लीच्या एम्सने (AIIMS) सर्वाधिक, म्हणजे ५४.२९ लाखांपेक्षा जास्त 'स्कॅन अँड रजिस्टर' नोंदणी केली आहे. त्यानंतर एम्स भोपाळ (२९.१० लाख), एम्स भुवनेश्वर (२३.९३ लाख), एम्स पाटणा (१९.६२ लाख) आणि एम्स रायपूर (१८.६३ लाख) यांचा क्रमांक लागतो. या संस्थांनी दैनंदिन आरोग्य सेवेत डिजिटल सेवा यशस्वीपणे कशा समाविष्ट केल्या आहेत, हे यावरून दिसून येते.