सार
भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून मिळाल्या होत्या. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्यातून सर्वाधिक जागा मिळतील, यावर भाष्य केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे. आत्तापर्यंतच्या झालेल्या 6 टप्प्यातील मतदानातूनच भाजपने सत्तास्थापनेसाठीचं बहुमत मिळवल्याचा दावा भाजपचे वरिष्ठ नेते करत आहेत. त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्यातून सर्वाधिक जागा मिळतील, यावर भाष्य केलं आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्रच नाही तर चक्क प. बंगालचंच नाव मोदींनी घेतलं आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून भाजपला 63 जागांवर विजय मिळाला होता. तर, महाराष्ट्रातून शिवसेना-भाजप युतीने मिळून 42 जागा जिंकल्या होत्या. मध्य प्रदेश, राजस्थान, आणि गुजरातमध्येही भाजपला घवघवित यश मिळालं होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपला कोणत्या राज्यातून मोठं यश मिळेल याबाबत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदींनी न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत यंदा तृणमूल काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढत आहे. येथील राज्यात गत विधानसभा निवडणुकीत आमच्याकडे केवळ 3 आमदार होते. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथील जननेनं भाजपला भरभरुन साथ दिली. भाजपने 80 जागांवर विजय मिळवला. गत विधानसभा निवडणुकीत आम्हाला मोठं यश मिळालं. त्यामुळेच, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजपसाठी बेस्ट परफॉर्मिंगचे स्टेट हे पश्चिम बंगाल असेल, असे मोदींनी म्हटले. भाजपला सर्वात मोठं यश पश्चिम बंगालमध्ये मिळत आहे. येथील निवडणूक एकतर्फी झाल्याचं मोदींनी म्हटलं.
2019 मध्ये भाजपाने जिंकल्या होत्या 18 जागा
पश्चिम बंगालमध्ये भाजपला अविश्वसनीय विजय मिळेल, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. तर, भाजपा नेत्यांनाही येथून 30 पेक्षा अधिक जागा जिंकता येतील, असा विश्वास आहे. त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मोठ्या विजयाचा विश्वास पश्चिम बंगालमधून व्यक्त केला आहे. त्यामुळे 4 जूनच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा असून गत 2019 मध्ये भाजपने 18 जागांवर यश मिळवले होते. तृणमूल काँग्रेसला 22 जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे यंदा कोणाचं पारडं जड राहणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
मतदानाची टक्केवारी वाढली
पश्चिम बंगालमध्ये 7 टप्प्यात मतदान होत असून गत निवडणुकांच्या तुलनेत यंदा प.बंगालमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्वच टप्प्यात 76 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करत प. बंगालच्या मतदारांनी उत्साह दाखवला आहे. संदेशखाली, ओबीसी आरक्षण, शिक्षक भरती घोटाळा आणि नंदीग्राम हिंसा यांसारख्या मुद्द्यांवर येथील निवडणूक चर्चेत होती. मात्र, मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवत निवडणुकीत सहभाग घेतल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे 4 थ्या टप्प्यात राज्यात 80 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे.