Lionel Messi India Visit : अर्जेंटिनाचा फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी 14 वर्षांनंतर भारतात परतला असून ‘GOAT इंडिया टूर 2025’ अंतर्गत कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीला भेट देणार आहे.
Lionel Messi India Visit : भारतीय फुटबॉल चाहत्यांची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 14 वर्षांनंतर भारतात परतला आहे. ‘GOAT इंडिया टूर 2025’चा भाग म्हणून तो तीन दिवस भारतात राहणार असून चार प्रमुख शहरांमधील चाहत्यांना भेट देणार आहे. मेस्सी पहाटे 1:30 वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत बार्सिलोनाचा माजी सहकारी लुईस सुआरेझ आणि अर्जेंटिनाचा संघमित्र रॉड्रिगो डी पॉल उपस्थित होते.
कोलकात्यात जल्लोषात स्वागत, चाहते रस्त्यावर
कोलकात्यात मेस्सीचे स्वागत उत्साहात करण्यात आले. हजारो चाहते अर्जेंटिनाची जर्सी, झेंडे, बॅनर आणि पोस्टर्स घेऊन रस्त्यावर जमले होते. ‘मेस्सी, मेस्सी!’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. चाहते रीजन्सी हॉटेलबाहेर तासन्तास वाट पाहत होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मेस्सीला मागील प्रवेशद्वारातून हॉटेलमध्ये नेण्यात आले, त्यामुळे अनेक चाहत्यांना त्याची प्रत्यक्ष झलक पाहता आली नाही. मेस्सी हा UNICEF चा ब्रँड अँबेसेडर असून त्याच भूमिकेतून तो भारत दौऱ्यावर आला आहे.
GOAT इंडिया टूर 2025 : पहिल्या दिवसाचे वेळापत्रक
GOAT इंडिया टूरच्या पहिल्या दिवशी मेस्सी सकाळी 9:30 वाजता कोलकात्यात चाहत्यांना भेटणार आहे. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता युवा भारती स्टेडियममध्ये त्याच्या 70 फूट उंच पुतळ्याचे वर्चुअल अनावरण होणार आहे. यावेळी सौरव गांगुली, शाहरुख खान आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही त्याची भेट होणार आहे. दुपारी 12:30 वाजता मेस्सी एक मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळणार असून दुपारी 2 वाजता तो हैदराबादकडे रवाना होईल.
हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली दौरा
लिओनेल मेस्सी दुपारी 4 वाजता हैदराबादमध्ये पोहोचणार आहे. येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये तो फुटबॉल सामन्यात सहभागी होणार असून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही या सामन्यात खेळणार आहेत. संध्याकाळी मेस्सीच्या सन्मानार्थ भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चाहत्यांना मेस्सीशी हस्तांदोलन आणि फोटो काढण्याची संधी मिळणार असून यासाठी सुमारे 9.95 लाख रुपये + GST (अंदाजे ₹10 लाख) शुल्क आकारले जाणार आहे. 14 डिसेंबर रोजी मेस्सी मुंबईत दाखल होईल, त्यानंतर तो दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे.


