गोव्यातील रोमेओ लेन नाइटक्लबमध्ये झालेल्या असुरक्षित रचना, कर्मचार्यांचा अयोग्य वर्तन आणि मारहाणीच्या महिन्यांपूर्वीच्या पर्यटक तक्रारी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
Goa nightclub controversy : एका पर्यटकाने काही महिन्यांपूर्वी गोव्यातील व्हेगेटर येथील रोमेओ लेन या नाइटक्लबबाबत केलेली असुरक्षित रचना असल्याची तक्रार पुन्हा समोर आली आहे. या क्लबचा संबंध सध्या फरार असलेल्या लुथरा बंधूंशी असून, गोवा प्रशासन त्यांच्यावर कारवाईचा वेग वाढवत आहे. पर्यटक वैभवी हिने नोव्हेंबरमध्ये क्लबला भेट दिली होती. तिने सांगितले की क्लबमध्ये उंचीवर फक्त एकच प्रवेश आणि निर्गमन मार्ग होता, ज्यामुळे सुरक्षिततेचे मोठे प्रश्न निर्माण होतात. अलीकडील कारवाईच्या पार्श्वभूमीवर तिची ही पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे.
वैभवीने सांगितले की ती आणि तिचे 12 चुलत भाऊ-बहिणी 1 नोव्हेंबर रोजी या शॅक-स्टाइल क्लबमध्ये गेले होते. तिथे गेल्यावरच त्यांच्या लक्षात आले की क्लबची रचना संकुचित आहे आणि बाहेर पडण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे. “क्लबची रचना इतकी घुसमट करणारी आहे. एकच एंट्री-एक्झिट, तेही उंचीवर. स्टाफ उद्धटपणे बोलला आणि अयोग्य वागला,” असे तिने सांगितले. नंतर वैभवीने सांगितले की रात्री सुमारे 3 वाजता त्यांचा ग्रुप बाहेर पडण्याच्या तयारीत असताना खुर्चीवरून झालेला छोटा वाद चिघळला.
पर्यटकांचे गंभीर आरोप
तिच्या म्हणण्यानुसार, मॅनेजरने त्यांच्यावर मालमत्ता तोडल्याचा आरोप केला आणि तिच्या चुलत भाव्याचे कॉलर पकडले व बाउन्सरांना बोलावले. “ते आमच्या मागे धावले, हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बहिणीला एवढे ढकलले की ती पायऱ्यांवरून खाली पडली. बाहेर जाण्यासाठी असणाऱ्या एकमेव मार्गावर त्यांनी बॅरिकेडही ठेवले,” असे ती म्हणाली.वैभवीने पुढे सांगितले की एका बाउन्सरने तिच्या भावाला लोखंडी रॉडने मारले आणि तिने हस्तक्षेप केला तेव्हा तिलाही मारहाण केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलिसात धाव घेतली. तक्रार नोंदली गेली, पण क्लबचे मालक उपस्थित नसल्याने त्यांची नावे FIR मधून काढल्याचा आरोप वैभवीने केला. “जर महिलांची आणि पर्यटकांची सुरक्षा गंभीरतेने घेतली नाही, तर अशा घटना गोव्यात सुरूच राहतील,” असेही तिने म्हटले.
अवैध बांधकामामुळे क्लबवर मोठी कारवाई
योगायोगाने ही पोस्ट पुन्हा चर्चेत येत असताना, पर्यटन विभागाने 9 डिसेंबर रोजी रोमेओ लेनचे अवैध बांधकाम पाडले.सुमारे 198 चौ.मी.चे हे लाकडी बांधकाम लुथरा बंधू – सौरभ आणि गौरव – यांनी पर्यटन खात्याच्या जमिनीवर उभारले होते. पोलिस संरक्षणात अवघ्या दोन तासांत ही रचना जमीनदोस्त झाली. हे पाडकाम मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आदेशानंतर झाले.
अर्पोरामधील भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू
याआधी 6 डिसेंबरला अर्पोरा येथील बर्च बाय रोमेओ लेन या त्यांच्या दुसऱ्या स्थळी लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाने लुथरा बंधूंच्या अनेक मालमत्ता सील केल्या असून सुरक्षा उल्लंघन, अनधिकृत बांधकामे आणि वैभवीसारख्या जुन्या तक्रारींच्या चौकशीतही वेग आला आहे. दोन्ही भावांचा शोध सुरू आहे.


