अटकेतील आरोपींची नावे मनोजित मिश्रा, जैब अहमद आणि प्रमित मुखोपाध्याय अशी आहेत. या तिघांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली.

कोलकाता - कोलकात्यातील एका नामांकित लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवर तिचे दोन सीनियर आणि एका माजी विद्यार्थ्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २५ जूनच्या संध्याकाळी घडली असून, तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

अटक झालेले आरोपी

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपींची नावे मनोजित मिश्रा, जैब अहमद आणि प्रमित मुखोपाध्याय अशी आहेत. या तिघांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. शुक्रवारी त्यांना दक्षिण २४ परगणा येथील अलीपूर न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी देण्याची विनंती करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी घडली घटना

तक्रारकर्त्या विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, ती २५ जून रोजी कॉलेजमध्ये गेली असताना, आरोपींनी तिला एका खोलीत नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलीसांनी सांगितले की, ही घटना संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली.

पोलीसांनी कॉलेजमधील गार्ड रूम सील केली असून, याच खोलीत हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, प्रमुख आरोपी मनोजित मिश्रा याने जबरदस्ती करून पीडितेला गार्ड रूममध्ये ओढून नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला, तर यावेळी इतर दोघे आरोपी बाहेर उभे राहून पहारा देत होते.

पीडितेची वैद्यकीय तपासणी सुरू

या प्रकरणी कसबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे आणि सर्व पुरावे गोळा करून आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल."

याआधीही असा प्रकार घडला होता

सदर प्रकरणाने कोलकात्यातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कारण, अवघ्या वर्षभरापूर्वी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे एका पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात संजय रॉय या कोलकाता पोलिसाच्या सिव्हिक व्हॉलंटियरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी

या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शिक्षणसंस्थांमध्ये सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सामाजिक संघटना, महिला आयोग आणि विविध विद्यार्थी संघटनांनी तातडीने या प्रकरणाचा निषेध नोंदवत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

पुढील तपासासाठी पोलीसांनी आरोपींच्या मोबाइल, सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले आहे. न्यायालयीन प्रक्रिया आणि तपासात लवकरच अधिक स्पष्ट माहिती समोर आणेल.