Most Expensive Number Plate In India: 'बिग बॉय टॉयज' द्वारे आयोजित लिलावात 'DDC 0001' ही नंबर प्लेट तब्बल २.०८ कोटी रुपयांना विकली गेली आहे. यासह ही भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी रजिस्ट्रेशन प्लेट ठरली असून, तिने सर्व जुने विक्रम मोडीत काढले.

नवी दिल्ली : 'शौक बडी चीज है...' असं म्हणतात ते उगाच नाही! एखाद्या आलिशान कारची किंमत किती असावी? ५० लाख, १ कोटी? पण भारतात एका नंबर प्लेटने कारच्या किमतीलाही मागे टाकले आहे. 'DDC 0001' या नंबर प्लेटचा नुकताच लिलाव झाला असून, ती चक्क २ कोटी ८ लाख रुपयांना विकली गेली आहे. यासह ही नंबर प्लेट भारतातील आजवरची सर्वात महागडी रजिस्ट्रेशन प्लेट ठरली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कुठे झाला हा ऐतिहासिक लिलाव?

सेकंड हँड लक्झरी कार क्षेत्रातील नामांकित कंपनी 'बिग बॉय टॉयज' (Big Boy Toyz) च्या नवीन ऑक्शन हाऊसच्या लाँचिंग सोहळ्यात हा लिलाव पार पडला. या प्लॅटफॉर्मच्या लाँचिंगपेक्षा चर्चा रंगली ती या युनिक नंबर प्लेटवर लागलेल्या कोट्यवधींच्या बोलीची.

कोणी लावली २.०८ कोटींची बोली?

ही विशेष नंबर प्लेट आधी बिग बॉय टॉयजचे संस्थापक जतिन आहुजा यांच्या मालकीची होती. लिलावादरम्यान आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील किरण कोलपाकुला यांनी या नंबरसाठी सर्वाधिक २.०८ कोटी रुपयांची बोली लावली आणि ती आपल्या नावावर केली. एका नंबर प्लेटसाठी एवढी मोठी रक्कम खर्च केल्यामुळे देशभरात त्यांच्या या 'रॉयल' आवडीची चर्चा होत आहे.

जुने सर्व रेकॉर्ड मोडीत!

या लिलावाने भारतातील नंबर प्लेट्सच्या किमतीचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.

नवा रेकॉर्ड: ‘DDC 0001’ – ₹२.०८ कोटी

जुना रेकॉर्ड: हरियाणाची ‘HR88B8888’ – ₹१.१७ कोटी (नोव्हेंबरमध्ये झालेली सरकारी लिलाव प्रक्रिया)

त्यापूर्वीचा रेकॉर्ड: केरळची ‘KL 07 DG 0007’ – ₹४६ लाख

जतिन आहुजा काय म्हणतात?

लिलावानंतर बोलताना जतिन आहुजा म्हणाले की, "आता लोक केवळ कार खरेदी करत नाहीत, तर दुर्मिळ आणि मौल्यवान गोष्टी संग्रही ठेवण्यात रस दाखवत आहेत. जेव्हा व्यवहाराची रक्कम करोडोंमध्ये असते, तेव्हा विश्वास आणि पारदर्शकता खूप महत्त्वाची ठरते. हा लिलाव सिद्ध करतो की, भारतात कलेक्टर्स खऱ्या आणि विशेष गोष्टींसाठी मोठी किंमत मोजायला तयार आहेत."

जतिन आहुजा यांनी काही महिन्यांपूर्वी एका मारुती सुझुकी इग्निस कारसोबतचे फोटो शेअर केले होते, ज्यावर ही प्लेट लावलेली दिसली होती. आता ती एका नवीन मालकाच्या ताफ्यात सामील झाली आहे.