Karnataka Bank 1 lakh Crore Transfer: कर्नाटक बँकेच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे १ लाख कोटी रुपये दुसऱ्या खात्यात हस्तांतरित झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटक बँकेची एकूण ठेव रक्कम १.४ लाख कोटी रुपये आहे. एका चुकीमुळे बँक जवळपास रिकामी झाली होती.

बंगळूर: देशातील प्रमुख बँकांपैकी कर्नाटक बँक ही एक आहे. मंगळूरस्थित ही बँक देशभरात कार्यरत आहे. देशभरात सुमारे १,००० शाखा असलेल्या कर्नाटक बँकेत प्रत्येक व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक केला जातो. दोन-दोन वेळा क्रॉस-चेक केले जाते. पण कर्मचाऱ्याच्या एका चुकीमुळे कर्नाटक बँकेतील सर्व ठेवी आणि रक्कम रिकामी होण्याची घटना घडली आहे. तब्बल १ लाख कोटी रुपयांची रक्कम चुकून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित झाल्याने बँक संकटात सापडली होती.

कर्नाटक बँक कर्मचाऱ्याची 'फॅट फिंगर' चूक

कर्नाटक बँकेच्या कर्मचाऱ्याच्या एका चुकीमुळे बँकेचा पायाच हादरला होता. बँक कर्मचाऱ्याने केलेल्या एका चुकीमुळे कर्नाटक बँकेतील विविध ग्राहकांच्या ठेवी आणि इतर स्वरूपात ठेवलेल्या एकूण रकमेपैकी तब्बल १ लाख कोटी रुपये दुसऱ्या बँक खात्यात हस्तांतरित झाले, असा एक विशेष अहवाल मनीकंट्रोलने प्रसिद्ध केला आहे. ही रक्कम एकाच व्यवहारात हस्तांतरित करण्यात आली. याला बँकेच्या भाषेत 'फॅट फिंगर एरर' किंवा नजरचुकीने झालेली चूक म्हटले जाते.

१,००,००० कोटी रुपये, आरबीआय संतप्त

१,००,००० कोटी रुपयांची रक्कम एका निष्क्रिय खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती. त्यामुळे कर्नाटक बँकेचे कर्मचारी बचावले. कारण खाते निष्क्रिय असल्यामुळे या पैशांचा कोणत्याही प्रकारे वापर झाला नाही. मात्र, तब्बल ३ तासांनंतर ही रक्कम परत मिळवण्यात आली. ही घटना ८ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.१७ वाजता घडली होती, जेव्हा पैसे हस्तांतरित झाले. खूप प्रयत्नांनंतर रात्री ८.०९ वाजता कर्मचाऱ्यांनी पैसे परत मिळवले.

हे पैसे नजरचुकीने गेले की यामागे दुसरा काही हेतू होता, याबद्दल आरबीआयने नाराजी व्यक्त केली आहे. हे पैसे हस्तांतरण २०२३ मध्ये झाले होते. परंतु कर्नाटक बँकेच्या जोखीम व्यवस्थापन टीमने ११ मार्च २०२४ रोजी याबद्दल सविस्तर अहवाल देण्यास सांगितले होते. आयटी विभागाने १५ मार्च २०२४ रोजी सविस्तर अहवाल सादर केला. त्यानंतर २८ मार्च रोजी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे स्पष्टीकरण दिले. परंतु, नजरचुकीने झालेली चूक दुरुस्त करण्यास झालेला विलंब आणि ऑडिट रिपोर्टमध्ये उशिरा उल्लेख केल्यामुळे आरबीआय संतप्त झाले होते.