जयपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तीन तरुण फूटपाथवरून शांतपणे चालताना दिसत आहेत, तर ट्रॅफिक चुकवण्यासाठी फूटपाथवर आलेले बाईकस्वार त्यांच्या मागे अडकले आहेत. एका कार चालकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड करत तरुणांचं कौतुक केलं आहे. फूटपाथ पादचाऱ्यांसाठीच असतो, हे दाखवून दिल्याबद्दल नेटकरी या तरुणांना दाद देत आहेत.

जयपूर, राजस्थान मधील एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्य रस्त्यावरची ट्रॅफिक चुकवण्यासाठी काही बाईकस्वार फूटपाथवर आले, पण तिथे तीन तरुण शांतपणे चालत होते. हा व्हिडिओ जयपूरच्या टोंक फाटक पुलाजवळचा (Tonk Phatak Puliya) असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, हे तरुण आपल्याच नादात चालत आहेत आणि त्यांच्या मागे बाईकस्वार हळूहळू गाड्या चालवत आहेत. बाईकस्वार सतत हॉर्न मारत होते, पण या तरुणांनी त्यांना रस्ता दिला नाही. सोशल मीडियावर लोक या तरुणांचं खूप कौतुक करत आहेत. फूटपाथ हा चालणाऱ्यांसाठी असतो, गाड्यांसाठी नाही, असं युजर्स म्हणत आहेत.

View post on Instagram
 
View post on Instagram
 

तरुणांच्या भूमिकेचं होतंय कौतुक

रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारमधील व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. तो हिंदीत या तरुणांचं कौतुक करताना ऐकू येतोय. 'बढिया, बढिया, बढिया, ये फूटपाथ आप लोगों के ही लिये है' (छान, छान, छान, हा फूटपाथ तुमच्यासाठीच आहे), असं तो म्हणतो.

व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने दिलेला पाठिंबा यातून स्पष्ट दिसतो. बाईकस्वारांसोबत कोणताही वाद न घालता किंवा न भांडता, हे तिघेही शांतपणे चालत राहिले. त्यामुळे बाईकस्वारांना त्यांच्या मागे अगदी हळू जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.

जेव्हा गाड्या पादचाऱ्यांच्या जागेत घुसतात तेव्हा किती त्रास होतो, हे या तरुणांनी अगदी साध्या पद्धतीने दाखवून दिलं आहे. त्यामुळेच लोक या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

'वर पुन्हा हॉर्न मारण्याची हिंमत'

कोणताही आरडाओरडा न करता या तरुणांनी आपली बाजू मांडल्याने अनेक युजर्सनी त्यांचं कौतुक केलं आहे. 'सेटिंग अ राईट एक्झाम्पल' (योग्य उदाहरण समोर ठेवलं), 'एक्झेलेंट एकदम सही' आणि 'गुड जॉब, एव्हरीवन डझ धिस' (छान काम, प्रत्येकजण असंच करतो), अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

काहींनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने 'रिअल वॉरियर्स' (खरे योद्धे) असं म्हटलंय, तर दुसऱ्याने 'भाईचारा ऑन टॉप' अशी कमेंट केली आहे. फूटपाथवर चालणाऱ्यांनाच हॉर्न मारणाऱ्या बाईकस्वारांच्या आगाऊपणावरही अनेकांनी बोट ठेवलं आहे.

या व्हिडिओमुळे, वर्दळीच्या रस्त्यांवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांचा वाहनचालकांनी विचार करायला हवा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

फूटपाथ हा लहान मुले, वृद्ध आणि चालणाऱ्यांसाठी हक्काचा रस्ता असतो. जेव्हा दुचाकीस्वार ट्रॅफिक चुकवण्यासाठी या रस्त्यांचा वापर करतात, तेव्हा ते पादचाऱ्यांचा रस्ता अडवतात आणि त्यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करतात.

ट्रॅफिकच्या एका साध्या घटनेने आता रस्ते सुरक्षा आणि पादचाऱ्यांच्या हक्कांबद्दल ऑनलाइन चर्चा घडवून आणली आहे.