९ ते ५ ची नोकरी सोडून सायकलवरून जगभ्रमंतीवर निघालेला एक आयरिश तरुण आता भारतात आला आहे. शेन नावाच्या या तरुणाने ३ महिन्यांत देशातील १०० गावे फिरण्याचे आव्हान स्वीकारले आहे. या प्रवासात तो इथली संस्कृती, खाद्यपदार्थ आणि लोकांच्या रोजच्या जगण्याच्या कथा कॅमेऱ्यात कैद करत आहे.
मुंबई : ९ ते ५ ची नोकरी सोडून २९ व्या वर्षी सायकलवरून जग फिरायला निघालेला एक आयरिश तरुण आता त्याच्या प्रवासात भारतत दाखल झाला आहे. शेन असं त्याचं नाव असून, त्याने देशभरातील १०० गावे फिरण्याचे आव्हान घेतले आहे. या प्रवासात तो इथले लोक, जेवण, संस्कृती आणि रोजच्या जगण्याच्या कथा जगासमोर आणत आहे.
एका जागी स्थिर राहण्यापेक्षा शेन आता प्रवासात तंबू ठोकून राहतो. त्याचे अनुभव रेकॉर्ड करण्यासाठी त्याच्याकडे कॅमेरा आणि ड्रोन आहे आणि तो सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करतो. त्याचा हा प्रवास अफगाणिस्तानमधून सुरू झाला होता आणि तेथील सफर संपवून तो नुकताच भारतात आला आहे.
हा व्हायरल व्हिडिओ येथे पाहा:
आयरिश तरुणाचे १०० गावांचे टार्गेट
कंटेंट क्रिएटर शशांक शर्माने शेनला दिल्लीत सायकलवर पाहिलं, तेव्हा शेनचा हा सगळा प्लॅन चर्चेत आला. त्याच्या या आगळ्यावेगळ्या प्रवासाबद्दल कुतूहल वाटल्याने शर्माने त्याच्याशी गप्पा मारल्या आणि नंतर तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.
शेनने सांगितलं की, तो दिल्लीहून दक्षिण भारताकडे सायकल चालवणार आहे आणि पुढे श्रीलंकेला जाईल. १०० भारतीय गावांना भेट देण्याचं आणि तिथल्या लोकांचं आयुष्य, जेवण, संस्कृती आणि कथा कॅमेऱ्यात कैद करण्याचं त्याचं ध्येय आहे. हे आव्हान तो तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना शर्माने लिहिलं: "एक आयरिश तरुण १०० भारतीय 🇮🇳 गावांमध्ये सायकलवरून फिरतोय... सोलो ट्रॅव्हलसाठी ही एक मोठी प्रेरणा आहे."
या पोस्टवर रिप्लाय करताना शेनने शर्माचे आभार मानले आणि पुढचा प्रवास हे त्याच्या आयुष्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे. भारताचा प्रचंड आकार पाहून त्याला आश्चर्य वाटलं असून, तो देश फिरण्यासाठी आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आहे.ताजमहल पाहण्याचीही इच्छा
शेनने आतापर्यंत फक्त दिल्ली फिरली आहे, पण त्याच्या यादीत अनेक ठिकाणे आहेत. एका सोशल मीडिया युझरने विचारल्यावर त्याने सांगितलं की, त्याला गोवा खूप भारी वाटला. शिवाय, ताजमहल पाहणं हे त्याच्या पहिल्या काही प्राधान्यांपैकी एक आहे.
भारतातील सायकल प्रवास संपवून शेन त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी श्रीलंकेला जाणार आहे. विविध प्रदेशांतील समुदायांना जवळून अनुभवण्याची आणि तिथल्या रोजच्या जगण्याची माहिती गोळा करण्याची ही ट्रिप म्हणजे एक मोठी संधी असल्याचं तो मानतो.
शेनच्या प्रवासावर सोशल मीडियाची प्रतिक्रिया
इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नोकरी सोडून प्रवासाला जीवन मानण्याच्या त्याच्या निर्णयाचं नेटकरी कौतुक करत आहेत. काहींनी त्याला शुभेच्छा दिल्या, तर काहींनी त्याच्या धाडसी वृत्तीचं कौतुक करत या वेगळ्या जीवनशैलीला सलाम केला आहे.
शेनचा हा १०० गावांचा प्लॅन भारताला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देतो. केवळ प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर न जाता तो स्थानिक लोकांच्या कथा जगासमोर आणत आहे. आता तो जसजसा दक्षिणेकडे जाईल, तसतसा तो कोणते लोक, ठिकाणे आणि अनुभव आपल्या ट्रॅव्हल डायरीत नोंदवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.














