स्पाइसजेटच्या फ्लाईटला उशीर झाल्याने, वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर एका प्रवाशाने हंबरडा फोडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअरलाइनच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

मुंबई : दिल्ली विमानतळावर एक अत्यंत भावनिक प्रसंग घडला. स्पाइसजेट (SpiceJet) फ्लाईटला उशीर झाल्यामुळे, वडिलांच्या निधनानंतर घरी जाण्यासाठी एका मुलाला मोठा संघर्ष करावा लागला.हा प्रवासी दिल्लीहून पाटण्याला जाण्यासाठी निघाला होता, पण फ्लाईटला वारंवार उशीर होत होता. वडिलांचे अंत्यसंस्कार जवळ आल्याने, तो विमानतळावरील कर्मचाऱ्यांना आपल्याला घरी पोहोचवण्यासाठी मदत करण्याची विनवणी करत होता.

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाचे (DUSU) अध्यक्ष यश डबास यांनी या घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये हा प्रवासी एअरलाइन कर्मचाऱ्यांसमोर रडताना दिसत आहे.या भावनिक व्हिडिओत तो माणूस सांगतोय की त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे आणि तो कर्मचाऱ्यांना त्याला घरी पोहोचवण्यासाठी वारंवार विनंती करत आहे.इतर प्रवासीही फ्लाईटची वाट पाहत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली होती.

DUSU अध्यक्षांचा स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना जाब

हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारे यश डबास यांनी स्पाइसजेटच्या ग्राऊंड स्टाफला या विलंबाबद्दल जाब विचारला आणि एअरलाइनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विमानतळावरील फ्लाईट इन्फॉर्मेशन डिस्प्लेकडे बोट दाखवत डबास यांनी सांगितले की, पाटण्याचे विमान गेट 34 वरून सुटणार होते, पण बोर्डिंग अजूनही सुरू झाले नव्हते.जर वेळापत्रकानुसार फ्लाईट्स चालवता येत नसतील तर एअरलाइन्स बुकिंग का स्वीकारतात, असा सवालही त्यांनी केला.

फ्लाईट लेट झाल्यामुळे एका मुलाला वडिलांच्या अंत्यसंस्काराला मुकावे लागण्याची शक्यता असल्याने डबास यांनी व्हिडिओत संताप व्यक्त केला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना, प्रवाशांना अशा त्रासाला सामोरे जायला लावल्याबद्दल त्यांनी एअरलाइनवर टीका केली.

स्पाइसजेटने जबाबदारी घ्यावी आणि अशा आणीबाणीच्या परिस्थितीत प्रवाशांप्रती सहानुभूती दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

या घटनेमुळे वैयक्तिक आणीबाणीच्या वेळी योग्य संवाद आणि प्रवाशांना मदतीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

स्पाइसजेटच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

स्पाइसजेटच्या कामकाजातील अडथळ्यांवरून आधीच टीका होत असताना ही ताजी घटना समोर आली आहे.नोव्हेंबरच्या सुरुवातीला, दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. 19 नोव्हेंबरची त्यांची फ्लाईट अनेक तास लेट झाली आणि नंतर रद्द करण्यात आली. यामुळे वैतागलेले प्रवासी आणि एअरलाइन कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली होती.

एअरलाइनच्या या अडचणींकडे विमान वाहतूक क्षेत्रातील लोकांचेही लक्ष वेधले गेले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, स्पाइसजेटकडे कागदोपत्री जवळपास 50 विमाने असली तरी ते फक्त पाच विमाने चालवत होते.

22 नोव्हेंबर रोजी फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (FIP) ने विमान वाहतूक सुरक्षेच्या धोक्याचा हवाला देत एअरलाइनच्या चालू असलेल्या आर्थिक आणि परिचालन संकटात सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.

विमानतळावरील या ताज्या घटनेमुळे प्रवाशांचा अनुभव, फ्लाईट मॅनेजमेंट आणि अनपेक्षित विलंबाच्या वेळी प्रवाशांप्रती एअरलाइन्सची जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत.पण त्या दुःखी प्रवाशासाठी हा केवळ एक त्रासदायक प्रवास नव्हता. तर जीवनातील सर्वात कठीण प्रसंगात घरी पोहोचण्याचा तो एक आटोकाट प्रयत्न होता.