नवी मुंबईहून श्रीनगरला जाणारं इंडिगोचं विमान शुक्रवारी श्रीनगर एअरपोर्टवर टॅक्सी करताना एका खांबाला धडकलं. सुदैवाने सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुखरूप आहेत. एअरपोर्टचं कामकाज सुरळीत सुरू असून, या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

श्रीनगर : शुक्रवारी सकाळी श्रीनगर एअरपोर्टवर इंडिगोच्या विमानात बसलेले प्रवासी आणि क्रू मेंबर्स एका छोट्याशा अपघातातून थोडक्यात बचावले. विमान पार्किंग बेमध्ये टॅक्सी करत असताना त्याचा पंख एका व्हिज्युअल डॉकिंग गायडन्स सिस्टीम (VDGS) खांबाला घासल्याची माहिती एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी दिली.

ही घटना इंडिगोच्या 6E 225 (VT-NOG) या विमानासोबत घडली. हे विमान नवी मुंबईहून श्रीनगरला आलं होतं. एअरपोर्ट अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सकाळी साधारण ९:०२ वाजता बे नंबर ०६ वर विमान पार्क करत असताना ही धडक झाली. विमानात असलेले सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुखरूप असून, कोणालाही इजा झालेली नाही.

या घटनेनंतर मॅन्युअल मोबाईल एअरस्टेअर्सच्या (शिडीच्या) मदतीने प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आलं. या प्रकरणामुळे श्रीनगर एअरपोर्टवरील इतर विमान उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नाही आणि कामकाज सुरळीत सुरू राहिलं.

एअरपोर्ट प्रशासनाने एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, "ही घटना नेमकी कशामुळे घडली, याच्या कारणांची आणि परिस्थितीची नियमांनुसार चौकशी केली जाईल. चौकशी पूर्ण झाल्यावरच नेमकं कारण स्पष्ट होईल. सध्या आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही." या निवेदनात पुढे असंही म्हटलं आहे की, एअरपोर्टचं कामकाज सामान्यपणे सुरू असून, सर्व प्रवासी आणि भागधारकांसाठी सुरक्षित आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

इंडिगोच्या दुसऱ्या विमानातही तांत्रिक बिघाड

याआधी मंगळवारी, इंडिगोच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली होती. गोव्याहून दिल्लीला जाणारं इंडिगोचं 6E 2102 हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतलं. या विमानात एकूण २२९ प्रवासी होते आणि ते सर्व सुखरूप होते.

एअरपोर्ट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानाने सकाळी ९:२८ वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं, पण इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्या शक्यतेमुळे विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. सूत्रांनी सांगितलं की, विमानातील सर्व २२९ प्रवासी सुरक्षित उतरले. या प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आणि दुपारपर्यंत त्यांना दिल्लीला पाठवण्यात आलं. इंडिगोनेही या घटनेला दुजोरा दिला आहे. उड्डाणानंतर लगेचच तांत्रिक अडचण लक्षात आली आणि पायलट्सनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) नुसार विमान विमानतळावर परत आणलं, असं कंपनीने स्पष्ट केलं.