जागतिक हवामान संघटनेने (WMO) एक मोठा इशारा दिला आहे. एल निनोचा प्रभाव फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहू शकतो. पण त्याचा परिणाम प्रत्येक ठिकाणी सारखा नसेल. हिंदी आणि अटलांटिक महासागरातील हवामानाचे इतर घटक काही ठिकाणी त्याचा प्रभाव कमी-जास्त करू शकतात, असंही संघटनेनं स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्ली : उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील तापमान असामान्य पातळीवर वाढल्याने 'एल निनो' आणखी शक्तिशाली होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असा धोक्याचा इशारा जागतिक हवामान संघटनेने (WMO) दिला आहे. हा धोका फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहू शकतो, असंही संघटनेनं म्हटलं आहे. एका शक्तिशाली एल निनोमुळे जगभरातील अनेक भागांमध्ये पावसाचं आणि तापमानाचं नेहमीचं चक्र बिघडू शकतं आणि तीव्र नैसर्गिक आपत्त्या येऊ शकतात, असंही WMO ने स्पष्ट केलं आहे.
पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, शक्तिशाली एल निनोचा परिणाम प्रत्येक ठिकाणी सारखाच नसतो. तसेच, केवळ एल निनोच्या ताकदीवरून एखाद्या देशात किंवा प्रदेशात किती परिणाम होईल हे ठरत नाही. त्याचा प्रभाव प्रत्येक प्रदेश आणि हवामानाच्या ऋतूनुसार बदलतो. याशिवाय, हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागरातील हवामानाचे इतर घटक काही ठिकाणी एल निनोचा प्रभाव अधिक तीव्र करू शकतात किंवा कमी करू शकतात, असंही जागतिक हवामान संघटनेने म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्रीय हवामान विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण केरळमध्ये यंदा मान्सूनमध्ये खूपच कमी पाऊस झाल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. मान्सून सुरू होऊन तीन महिने उलटले तरी राज्यात तब्बल २१ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, ३० ऑगस्टपर्यंत केरळमध्ये सरासरी १७३५.२ मिमी पाऊस पडायला हवा होता, पण प्रत्यक्षात फक्त १३६५.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वायनाड आणि इडुक्की जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता कायम आहे. सर्वात कमी पाऊस वायनाड जिल्ह्यात झाला, जिथे तब्बल ५१ टक्के तूट आहे. त्याखालोखाल इडुक्की जिल्ह्यात ४५ टक्के, कोल्लममध्ये ३० टक्के, त्रिशूरमध्ये २७ टक्के आणि पालक्काडमध्ये २६ टक्के पावसाची कमतरता नोंदवण्यात आली.

