देशात E20 पेट्रोल लागू झाल्यानंतर सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने संसदेत स्पष्टीकरण दिलं आहे. E20 पेट्रोल आणण्यापूर्वी सविस्तर अभ्यास केला होता आणि यामुळे गाड्यांच्या इंजिनमध्ये कोणताही बिघाड झाल्याचं आढळलेलं नाही, असं सरकारने स्पष्ट केलंय.

नवी दिल्ली: देशात E20 पेट्रोल (20% इथेनॉल मिश्रण असलेलं पेट्रोल) लागू झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. या पेट्रोलमुळे गाडीचं इंजिन खराब होतंय, मायलेज कमी झालंय आणि गाडीच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतोय, अशा तक्रारी अनेक भागांतून येत होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संसदेत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितलं की, E20 इंधन आणण्यापूर्वी मोठे वैज्ञानिक अभ्यास आणि तांत्रिक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. जवळपास 23 कोटी वाहनांवर केलेल्या पाहणीत E20 मुळे इंजिनमध्ये कोणताही बिघाड किंवा असामान्य नुकसान झाल्याचं आढळून आलेलं नाही.

प्रीमियम पेट्रोल अजूनही इथेनॉल-फ्री

सरकारने स्पष्ट केलंय की, देशात विकलं जाणारं सामान्य पेट्रोल हे E20 आहे, ज्यात जास्तीत जास्त 20 टक्के इथेनॉल मिसळलेलं असतं. पण प्रीमियम पेट्रोलला हा नियम लागू नाही. इंडियन ऑइलचं XP100, हिंदुस्थान पेट्रोलियमचं Power 100 आणि भारत पेट्रोलियमचं Speed 100 यांसारखी प्रीमियम इंधनं इथेनॉल-मुक्त आहेत. ही पूर्णपणे E0 (zero ethanol) श्रेणीत येतात. मात्र, देशातील एकूण पेट्रोल विक्रीत अशा प्रीमियम इंधनाचा वाटा फक्त 0.5 टक्के असल्याचंही मंत्रालयाने नमूद केलं.

E25 किंवा E27 चा सध्या विचार नाही

पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळून E25 किंवा E27 पेट्रोल आणलं जाईल, अशा चर्चांनाही सरकारने पूर्णविराम दिला आहे. सध्या E20 पेक्षा जास्त इथेनॉल मिश्रण लागू करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं लोकसभेत सांगण्यात आलं. भविष्यात असा निर्णय घेण्याची वेळ आल्यास, वैज्ञानिक अभ्यास, तांत्रिक चाचण्या आणि वाहन उत्पादक, तेल कंपन्या, संशोधन संस्था यांच्याशी चर्चा करूनच पुढील पावलं उचलली जातील, असं सरकारने स्पष्ट केलं.

E20 मुळे इंजिन खराब झाल्याचा पुरावा नाही

E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब होतं, हा आरोपही सरकारने फेटाळून लावला आहे. E20 लागू करण्यापूर्वी ऑटोमोबाईल कंपन्या, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) आणि तेल कंपन्यांसोबत मिळून सविस्तर अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये गाडीच्या पार्ट्सची सुसंगतता, इंजिनचं दीर्घकालीन प्रदर्शन, इंधन प्रणालीचं काम, ड्रायव्हिंग परफॉर्मन्स आणि प्रदूषण नियंत्रण या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतरच E20 लागू करण्यात आलं, असं मंत्रालयाने सांगितलं.

एका मोठ्या वाहन उत्पादक कंपनीने 2025-26 या आर्थिक वर्षात सर्व्हिस केलेल्या 2.84 कोटी गाड्यांची माहिती दिली. यात सुरुवातीला E20 सर्टिफिकेशन नसलेल्या 1.5 कोटी गाड्यांचाही समावेश होता, पण इथेनॉलमुळे कोणतंही नुकसान झाल्याचं आढळलं नाही. दुसऱ्या एका मोठ्या कंपनीच्या 1.4 कोटी E20 वाहनांच्या दीर्घकालीन डेटामधूनही असेच निष्कर्ष समोर आले आहेत, असंही सरकारने सांगितलं.

पंपांवर E20 असं लेबल का नाही?

पेट्रोल पंपांवर E20 असं वेगळं का लिहिलेलं नसतं, या प्रश्नावरही सरकारने उत्तर दिलं. सरकारी तेल कंपन्यांच्या पंपांवर सामान्य पेट्रोल म्हणून जे मिळतं, ते सर्व E20 च आहे. तिथे E0 किंवा E10 पेट्रोल वेगळं विकलं जात नाही. त्यामुळे वेगळं लेबल लावण्याची गरज नाही. याउलट, जिथे 85% इथेनॉल असलेलं E85 इंधन मिळतं, तिथे ते स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. कारण E85 इंधन फक्त फ्लेक्स-फ्यूएल गाड्यांसाठीच योग्य आहे आणि ते सामान्य पेट्रोल गाड्यांमध्ये वापरता येत नाही, असं मंत्रालयाने स्पष्ट केलं.

थोडक्यात, E20 पेट्रोलबाबतचे सर्व निर्णय वैज्ञानिक अभ्यासावर आधारित आहेत आणि सध्या E20 मुळे इंजिन खराब होत असल्याचा कोणताही ठोस पुरावा सरकारकडे नाही, असं केंद्र सरकारने संसदेत पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.