शैक्षणिक तज्ज्ञ असल्याचं भासवून चिनी गुप्तहेरांनी एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीकडून महत्त्वाची माहिती उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जम्मू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

श्रीनगर: चिनी हेरांना देशाची अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाची माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला मूळची तेलंगणाची असून ती सध्या जम्मूमधील गांधी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. पोलिसांनी अद्याप तिचं नाव किंवा इतर माहिती उघड केलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी गुप्तहेरांनी 'शैक्षणिक तज्ज्ञ' असल्याचं भासवून या महिलेशी संपर्क साधला. सुरुवातीला त्यांनी तिला पर्यावरण आणि भू-राजकीय विषयांवर लेख लिहिण्यास सांगितलं. पण नंतर हळूहळू त्यांनी संरक्षण क्षेत्राशी संबंधित माहिती काढायला सुरुवात केली. यातूनच या महिलेने अनेक गोपनीय कागदपत्रे, फोटो आणि डेटा चिनी हेरांना पुरवल्याचं तपासात उघड झालं आहे.

चीनसह इतर परदेशी गुप्तचर संस्थांनी रचलेल्या या जाळ्यात लष्करी अधिकाऱ्याची पत्नी सहज अडकली. या हेरांच्या सांगण्यावरून तिने बरीच संवेदनशील माहिती शेअर केली आहे. मात्र, तिने नेमकी कोणती माहिती लीक केली, याचा तपशील पोलिसांनी अद्याप दिलेला नाही. ही महिला परदेशी हेरांच्या संपर्कात कशी आली आणि तिने नेमकी काय माहिती दिली, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.