India Provides Safe Harbor to Iranian Warship IRIS Lavan in Kochi: विशाखापट्टणममध्ये संयुक्त नौदल सरावासाठी आलेलं इराणचं एक जहाज कोचीमध्ये दाखल झालं आहे. आयआरआयएस लावन (IRIS Lavan) नावाच्या या जहाजाला भारतात थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेने इराणच्या दुसऱ्या जहाजावर हल्ला करण्यापूर्वीच भारताने ही परवानगी दिली होती.

नवी दिल्ली: विशाखापट्टणममध्ये झालेल्या संयुक्त नौदल सरावासाठी आलेल्या इराणच्या एका जहाजाला भारताने कोचीमध्ये थांबण्याची परवानगी दिली आहे. आयआरआयएस लावन (IRIS Lavan) असं या जहाजाचं नाव असून, सरकारी सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

विशेष म्हणजे, ज्या दिवशी (२८ तारीख) इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला केल्याचं म्हटलं जातं, त्याच दिवशी इराणने आपलं जहाज भारतात थांबवण्यासाठी परवानगी मागितली होती. भारताने १ तारखेला ही परवानगी दिली आणि ४ तारखेला हे जहाज कोचीच्या किनाऱ्यावर दाखल झालं.

या जहाजावरील १८३ जणांसाठी भारतीय नौदलाच्या तळावर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याच ताफ्यातील आयआरआयएस देना (IRIS Dena) नावाचं दुसरं जहाज अमेरिकेने गेल्या आठवड्यात बुडवलं होतं. तर, आयआरआयएस बुशहर (IRIS Bushehr) नावाचं तिसरं जहाज श्रीलंकेच्या किनाऱ्यावर थांबलं होतं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, अमेरिकेने आयआरआयएस देना जहाज बुडवण्याआधीच भारताने इराणच्या दुसऱ्या जहाजाला आसरा दिला होता.