‘इंडियाज गॉट लेटेंट’ प्रकरणात समय रैना आणि इतर आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने संबंधित आरोपींविरोधातील सर्व एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India's Got Latent) प्रकरणात कॉमेडियन समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिव्यांग व्यक्तींविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी समय रैना आणि इतर आरोपींविरोधात एफआयर दाखल करण्यात आला होता. यावरच कोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सदर एफआयआर संबंधित सुनावणी झाली.
समय रैनासह इतरांनाही दिलासा
समय रैनासोबत विपुल गोयल, बलराज परमजीत सिंह घई, सोनाली ठक्कर (उर्फ सोनाली आदित्य देसाई) आणि निशांत जगदीश तंवर यांनाही या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमधील कथित असंवेदनशील वक्तव्यांनंतर देशातील विविध ठिकाणी संबंधित व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या.
दिव्यांग व्यक्तींसाठी केलेल्या कामाचे कोर्टाकडून कौतूक
समय रैना आणि इतर आरोपींनी दिव्यांग व्यक्तींसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यासह निधी उभारण्यासाठी निर्देश दिले होते. याच निर्देशांचे सर्वांनी पालन केल्याची नोंद सुप्रीम कोर्टाने घेतली. या प्रयत्नांचे कोर्टाने कौतुकही केले. प्रामाणिक प्रयत्न केले तर त्याचे चांगले परिणाम मिळतात, असेही कोर्टाने म्हटले.
सर्व एफआयआर रद्द
याशिवाय खंडपीठाने म्हटले, अशा प्रकरणात पुढेही सुनावणी करणार. जेणेकरुन अशा कंटेटवर अधिक लक्ष कसे द्यावे आणि त्याच्या गाइडलाइन्स कशा पद्धतीच्या असाव्यात हे ठरवता येईल. याबद्दल दिव्यांगांकडूनही त्यांची मतं विचारात घेतली जातील. यासोबत सर्वांच्या विरोधातील फौजदारी कारवाईही रद्द केली जात असल्याने कोर्टाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इंडियाज गॉट लेटेंटचा हा एपिसोड 14 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईतील खार हॅबिटेटमध्ये शूट करण्यात आला होता. यानंतर तो रिलीज केला गेला. शो मध्ये सहभागी झालेल्या काही इंन्फ्लुएंसर आणि कॉमिडेयन्सवर दिव्यांग व्यक्तींच्या विरोधात असंवेदनशील वक्तव्यांमुळे काही एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या.


