Fuel Price Hike : अमेरिका-इराण युद्धाची झळ आता थेट भारताला बसली आहे. पेट्रोल ९७.७७ रुपये तर डिझेल ९०.६७ रुपयांवर पोहोचलंय. होर्मुझच्या संकटामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम झालाय. अनेक शहरांमध्ये लोकांनी घाबरून पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली असून, हे केवळ महागाईचं नाही, तर मोठ्या आर्थिक संकटाचं वादळ असू शकतं, अशी भीती व्यक्त होत आहे.
Petrol Diesel Price Hike India : शुक्रवारी सकाळी देशभरातील लोकांना मोठा धक्का बसला. एका बातमीने सामान्य माणसाचं बजेटच कोलमडलं. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर संकट आलंय. याचा थेट परिणाम भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर झाला आहे. सरकारने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, पेट्रोल प्रति लिटर जवळपास ३ रुपयांनी महाग होऊन ९७.७७ रुपयांवर पोहोचलं आहे, तर डिझेलचा दर ९०.६७ रुपये प्रति लिटर झाला आहे.

पेट्रोल पंपावर मध्यरात्रीपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये नवीन दर लागू होताच पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी दिसली. अनेक ठिकाणी अफवांमुळे लोकांनी घाबरून गाड्यांच्या टाक्या फुल्ल करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर रात्री उशिरापर्यंत लागलेल्या रांगांचे व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामुळे इंधन टंचाईची भीती आणखी वाढली आहे.

इंधनाचे नवे दर खालीलप्रमाणे:
- साधं पेट्रोल: ९४.७७ रुपयांवरून ९७.९१ रुपये प्रति लिटर
- प्रीमियम पेट्रोल: १०२-१०४ रुपयांवरून १०५.१४-१०७.१४ रुपये प्रति लिटर
- साधं डिझेल: ८७.६७ रुपयांवरून ९०.७८ रुपये प्रति लिटर
देशातील ४ मोठ्या शहरांमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत:
- दिल्ली - ९७.७७ (+३.००)
- कोलकाता - १०८.७४ (+३.२९)
- मुंबई - १०६.६८ (+३.१४)
- चेन्नई - १०३.६७ (+२.८३)
HSD (डिझेल) चे दर (रुपये प्रति लिटरमध्ये):
- दिल्ली - ९०.६७ (+३.००)
- कोलकाता - ९५.१३ (+३.११)
- मुंबई - ९३.१४ (+३.११)
- चेन्नई - ९५.२५ (+२.८६)
गुरुवारपासूनच अनेक शहरांमधील पेट्रोल पंपांवर लोकांच्या लांब रांगा दिसू लागल्या होत्या. इंधन संपण्याच्या भीतीने लोकांनी घाबरून गाड्यांमध्ये पेट्रोल-डिझेल भरायला (panic buying) सुरुवात केली. या दरवाढीपूर्वी सरकारने मार्च महिन्यात प्रीमियम पेट्रोलचे दर वाढवले होते.

आखिर दर का वाढले? पडद्यामागे नेमकं काय घडलं?
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पुरवठा साखळीवरही दबाव आहे. यामुळे तेल कंपन्यांना दररोज १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागत होता. अर्थ मंत्रालय हा भार जास्त काळ सहन करण्याच्या स्थितीत नव्हतं. तज्ज्ञांच्या मते, खरी चिंता 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' या सागरी मार्गाबद्दल आहे. हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग आहे. जर या मार्गावर काही परिणाम झाला, तर जागतिक तेल पुरवठा मोठ्या संकटात सापडू शकतो. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या लष्करी तणावामुळे हा धोका आता खरा वाटू लागला आहे.
ही फक्त सुरुवात आहे का?
ऊर्जा बाजारातील विश्लेषकांच्या मते, जर पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला, तर येत्या काही आठवड्यांत भारतातील इंधनाचे दर आणखी वाढू शकतात. याचा थेट परिणाम वाहतूक, अन्नधान्य, विमान प्रवास आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर होऊ शकतो. अनेक राज्यांमध्ये मालवाहतूक कंपन्यांनी अतिरिक्त शुल्क लावण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महागाईची नवी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न
सरकार टॅक्स कमी करून दर नियंत्रणात आणेल का? तेल पुरवठा सुरळीत राहील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हे जागतिक युद्ध एका नव्या आर्थिक संकटाची नांदी आहे का? सध्या पेट्रोल पंपांवर वाढणारी गर्दी आणि बाजारातील अस्वस्थता हेच सांगत आहे की, येणारे दिवस फक्त इंधनासाठीच नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक असू शकतात.

