जागतिक तापमानवाढ विक्रमी पातळीवर पोहोचल्याने शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या भवितव्याबाबत गंभीर इशारा दिला आहे. 'हॉथाऊस अर्थ'च्या धोक्यामुळे हिमनद्या वितळणे आणि समुद्रपातळी वाढणे यांसारख्या घटना वाढू शकतात, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर करणे आवश्यक बनले आहे.

जागतिक तापमान सातत्याने वाढत असल्याने पृथ्वीच्या भवितव्याबाबत शास्त्रज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. हवामान बदलाचा वेग वाढत असून जग विक्रमी उष्णतेच्या काळातून जात आहे. गेल्या काही वर्षांत पृथ्वीवरील सरासरी तापमानात झालेली वाढ ही केवळ तात्पुरती घटना नसून दीर्घकालीन संकटाचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

हिट का वाढली? 

अनेक संशोधनांनुसार पृथ्वीवरील उष्णतेची पातळी औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत धोकादायक मर्यादेच्या जवळ पोहोचली आहे. जर हरितगृह वायूंचे उत्सर्जन याच वेगाने सुरू राहिले, तर भविष्यात हवामानातील बदल अनियंत्रित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शास्त्रज्ञांनी "हॉथाऊस अर्थ" या संकल्पनेबाबतही इशारा दिला आहे. या परिस्थितीत पृथ्वीवरील तापमान इतके वाढू शकते की अनेक नैसर्गिक प्रक्रिया कायमस्वरूपी बदलू शकतात. हिमनद्या वितळणे, समुद्रपातळीत वाढ, तीव्र दुष्काळ आणि विनाशकारी पूर यांसारख्या घटना अधिक वारंवार घडू शकतात.

अनेक विक्रम मोडले गेले

 गेल्या काही वर्षांत पृथ्वीने अनेक विक्रमी उष्ण दिवस अनुभवले आहेत. हवामान निरीक्षण संस्थांच्या आकडेवारीनुसार जागतिक तापमानाचे अनेक विक्रम मोडले गेले असून समुद्रांचे तापमानही अभूतपूर्व पातळीवर पोहोचले आहे. या घडामोडींमुळे हवामान संकट आणखी तीव्र होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तज्ज्ञांच्या मते पृथ्वी लगेचच शुक्र ग्रहासारखी ज्वालामय होणार नाही, मात्र सध्याचा तापमानवाढीचा कल कायम राहिला तर मानवी जीवन, शेती, जलस्रोत आणि जैवविविधतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले जात आहे.

हवामान बदलाचे परिणाम 

आता भविष्यातील नव्हे तर वर्तमानातील वास्तव बनले आहेत. जगभरातील सरकारे, उद्योग आणि नागरिकांनी एकत्रितपणे पावले उचलली नाहीत तर पुढील काही दशकांत पृथ्वी अधिक उष्ण, अधिक अस्थिर आणि मानवासाठी कमी सुरक्षित बनू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.