P.V Sindhu Win Open Japan 2026 : स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने जपान ओपन सुपर ७५० स्पर्धेत बलाढ्य प्रतिस्पर्धीचा पराभव केला. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने रविवारी इतिहास रचला आहे. जपानची अकाने यामागुचीला मात देत तिने मोठा विजय मिळवला आहे. पी.व्ही सिंधूने जपान ओपन सुपर ७५० स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सिंधू जपान ओपनचं विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
जपान ओपन सुपर ७५० स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू
पी.व्ही सिंधूने ज्या अकाने यामागुचीचा पराभव केला, ती माजी विश्वविजेती होती. अकानेसोबत झालेल्या अंतिम फेरीमध्ये सिंधूने प्रतिस्पर्धीचा २१-१७, २१-१७ या फरकाने पराभव केला. या विजयानंतर ती जपान ओपन सुपर ७५० स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
याआधी सिंधूने दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे. ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सिंधूने २०१४ मध्ये सैयद मोदी इंटरनॅशनलचं विजेतेपद पटकावलं आहे. तर २०१९ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आता २०२६ मध्ये तिचा हा सर्वात मोठा विजय आहे.
५० मिनिटांत ऐतिहासिक कामगिरी
सिंधूने ५० मिनिटांत सामना आपल्या नावे केला. सिंधूने सुरुवातीपासून अकाने यामागुचीवर आपली दमदार पकड ठेवली होती. तिने दमदार स्मॅशने प्रतिस्पर्धीला हरवलं. पहिल्या गेममध्ये तिने केलेली खेळी दुसऱ्या गेममध्ये तशीच ठेवली. यातून तिने अकाने यामागुचीचा पराभव केला.
बलाढ्या प्रतिस्पर्धी अकाने यामागुची हिचा पी.व्ही सिंधूकडून पराभव
दरम्यान, अकाने यामागुची सहाव्यांदा जपान ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत होती. तर सिंधूने मागील चार वर्षात जपानच्या या खेळाडूचा पराभव केला नव्हता. या वर्षाच्या सुरुवातीला मलेशिया ओपनमध्ये अकाने यामागुचीने पहिला गेम झाल्यानंतर माघार घेतली होती. तिने माघार घेतल्यामुळे सिंधूने विजय मिळवला होता.
मात्र, आताच्या सामन्यात पी.व्ही सिंधूने अकाने यामागुची हिचा संपूर्ण स्पर्धेत २१-१७ या फरकाने पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. पी.व्ही सिंधूच्या या विजयाने क्रिडा विश्वात आनंद व्यक्त केला जात आहे.

